ठाण्यात पुरुषांच्या शेरेबाजीमुळे महिला रिक्षाचालक हैराण

सततच्या त्रासामुळे अनेक महिला रिक्षाचालकांची उमेद हरवत चालली आहे. 

Updated: Jul 26, 2018, 05:09 PM IST
ठाण्यात पुरुषांच्या शेरेबाजीमुळे महिला रिक्षाचालक हैराण title=

ठाणे:  शहरातील महिला रिक्षाचालकांना सध्या पुरुष रिक्षाचालकांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. महिलांना स्वयंरोजगार मिळावा यासाठी सरकारकडून काही दिवसांपूर्वी अबोली योजना सुरु करण्यात आली होती. यातंर्गत वाटप करण्यात येणाऱ्या रिक्षा परवान्यांमध्ये महिलांना पाच टक्के आरक्षण देण्यात आले होते. त्यामुळे अनेक महिला रिक्षा व्यवसायाकडे वळल्या होत्या. या काळातही त्यांना पुरुषांच्या मक्तेदारीला सामोरे जावे लागत असे. परंतु, आज ना उद्या परिस्थिती सुधारले, या आशेने रिक्षाचालक महिला प्रयत्न करत होत्या. 

मात्र, पुरुष रिक्षाचालकांच्या सततच्या त्रासामुळे अनेक महिला रिक्षाचालकांची उमेद हरवत चालली आहे. रिक्षा स्टँडवर महिलांच्या रिक्षासमोर स्वत:ची रिक्षा आडवी टाकणे, शेरेबाजी आणि अरेरावी अशाप्रकारचा त्रास पुरुषांकडून  दिला जातो.

ठाण्यात सध्या 450 महिला रिक्षाचालक आहेत. मात्र, या त्रासामुळे अनेक महिला या व्यवसायातून बाहेर पडत आहेत. या सगळ्या अडचणीवर तोडगा काढण्यासाठी आता महिला रिक्षाचालक स्वतंत्र थांब्याची मागणी करत आहेत. 

दरम्यान, वाहतूक शाखेचे उपायुक्त अमित काळे यांनी तातडीने या तक्रारींची दखल घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आता तरी ठाण्यातील परिस्थिती सुधारणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.