गुहागर - रत्नागिरी : शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे सुपूत्र दापोलीचे आमदार योगेश कदम आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांच्यात हा संघर्ष झालाय. राष्ट्रवादीचे नेते संजय कदम हे आता आमदार नाहीत. तरीही ते आपल्या मतदारसंघात भूमिपूजन करत फिरत आहेत.
मुख्यमंत्री सडक योजनेतील रस्त्याचे भूमिपूजन त्यांनी केले. अशी अनेक भूमिपूजने करून संजय कदम यांनी मा.आ. आणि पुढे स्वतःचे नाव लिहून ते जनतेची दिशाभूल करत आहेत. आता ते आमदार नाहीत याचे भान नसावे किंवा त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असावे अशी टीका आमदार योगेश कदम यांनी केलीय.
संजय कदम यांच्या या कृतीमुळे आमदार म्हणून आपला हक्क डावलण्यात आलाय. त्यामुळेच त्यांच्याविरोधात विधानसभेत हक्कभंग प्रस्तावासाठी विधानसभा उपाध्यक्षांना पत्र दिले आहे. नियम ७३ अन्वये हे पत्र विधानसभा उपाध्यक्ष महोदयांनी स्वीकारून पुढील कायदेशीर कारवाईसाठी हक्कभंग समितीकडे दिले आहे, अशी माहिती आमदार योगेश कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.