Donald Trumps Win What is the 4B Movement: अमेरिकेमधील राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक डोनाल्ड ट्रम्प यांनी जिंकल्यामुळे महिला वर्ग मोठ्याप्रमाणात चिंतेत असल्याचं चित्र दिसत आहे. खास करुन ट्रम्प पुन्हा सत्तेत आल्याने महिलांच्या गरोदर राहण्याच्या मूलभूत हक्कावर गदा येऊ शकते अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण या निवडणुकीमध्ये गर्भपाताचा अधिकार देणे आणि न देणे हा एक महत्त्वाचा मुद्दा होता. गर्भपाताचा अधिकार महिलांना हवा असं कमला हॅरिस यांचं म्हणणं होतं तर त्या उलट ट्रम्प यांच्या पक्षाचं धोऱण आहे. त्यामुळेच ते निवडणून आल्याने आता महिलांमध्ये चिंतेचं वातावरण असून अनेकांनी आता पुरुषांना डेटही करता येणार नाही अशी भिती व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर अनेक महिलांनी आता अमेरिकेमध्ये फोर बी (4B Movement) मोहीम सुरु करण्याचं ठरवलं आहे.
गर्भधारणा करायची की नाही या महिलांचा हक्कासंदर्भात ट्रम्प प्रशासन कठोर निर्णय घेणार असं निश्चित मानलं जात आहे. म्हणूनच महिलांनी 4B मोहीम हाती घेण्याचं ठरवलं आहे. मात्र ही 4B मोहीम आहे तरी काय? तर 4B ही मोहीम मूळची दक्षिण कोरियामधील आहे. येथील महिला पुरुषसत्ताक समाजाचा विरोध करण्यासाठी पुरुषांबरोबर लैंगिक संबंध ठेवताना निष्क्रीयपणे सहभागी होताना दिसतात. या महिला जाणीवपूर्वकपणे हे करत आहेत. महिलांविरोधात होणारे अत्याचार, रिव्हेंज पॉर्न, गर्भातच स्री अर्भकाची हत्या या साऱ्या गोष्टींना विरोध करण्यासाठी महिलांनी पुरुषांबरोबर लैंगिक संबंध न ठेवण्याचं हत्यार उपसल्याचं दक्षिण कोरियात दिसून येतं. महिलांविरोधातील अत्याचार थांबले नाहीत तर देशातील जन्मदर हा दिवसोंदिवस कमी होत जाईल. यासाठी आम्ही 4B मोहीम राबवू असा इशारा महिलांनी दिला असून या माध्यमातून देशाची लोकसंख्या कमी होऊन देशचं नष्ट होईल असा दावा केला जात आहे.
आता या मोहिमेला 4B नाव का पडलं असा प्रश्न पडला असेल तर 'वॉशिंग्टन पोस्ट'ने त्यांच्या बातमीमध्ये याचा खुलासा केला आहे. 4B मोहिमेमध्ये महिलांनी चार मूलभूत धोरणं ठरवली आहेत जी 'bi' या अक्षरापासून सुरु होतात. कोरियन भाषेत 'bi' चा अर्थ नाही म्हणजे 'No' असा होतो. यावरुनच या महिमेला 4B नाव पडलं आहे. आता हे चार बी कोणते आणि त्यांचा अर्थ काय ते पाहूयात...
Biyeonae: No dating men (पुरुषांना डेट करायचं नाही)
Bisekseu: No sex with men (पुरुषांबरोबर लैंगिक संबंध ठेवायचे नाहीत)
Bihon: No marriage (अविवाहित राहायचं)
Bichulsan: No child-rearing (मुलांना जन्म द्यायचा नाही)
'वॉशिंग्टन पोस्ट'च्या वृत्तानुसार, 4B मोहीम ही महिलांविरुद्ध होणाऱ्या हिंसाचाराला उत्तर देण्यासाठी राबवण्यात आली. या मोहिमेला अधिक पाठिंबा 2016 पासून मिळाला जेव्हा दक्षिण कोरियाची राजधानी असलेल्या सोल येथे एका सार्वजनिक शौचालयामध्ये तरुणीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. खरं तर ही 4B मोहीम 2010 च्या दशकाच्या मध्यापासून राबवली जात आहे. खास करुन इन्स्टाग्राम आणि टीकटॉकच्या माध्यमातून या मोहिमेला मोठी चालना मिळाली. या माध्यमातून अधिक अधिक महिलांनी आपल्या रोमँटिक नात्याला आवर घालत महिलांच्या सुरक्षेसाठी आवाज अधिक बुलंद करण्याची गरज असल्याचं आपल्या कृतीतून दाखवून दिलं.
आता अमेरिकेमध्येही महिलांनी त्यांच्या शरीराचं काय करावं यासंदर्भातील धोरणं अधिक कठोर आणि गरज नसताना खासगी आयुष्यात ढवळाढवळ करणारी होत आहेत असा आरोप केला आहे. महिलांच्या शरीरासंदर्भातील धोरणांना यापूर्वी कधीही नव्हतं तितकं महत्त्व दिलं जात असून हे महिलांसाठी सकारात्मक ऐवजी अधिक घातक ठरणार आहे. महिलांचं शरीर आणि त्याविषयीची धोरणं आता अमेरिकेत राजाकरणाचा भाग होत असल्याचं येथील महिलांना खटकत आहे. त्यामुळेच आता त्यांनीही दक्षिण कोरियामधील ही 4B धोरणाची कास पकडण्याचा विचार केला आहे. लैंगिक समानतेसाठीचा लढा आता 4B मोहिमेच्या माध्यमातून लढण्याची तयारी अमेरिकी महिला करत आहेत.
अनेक महिलांनी यासंदर्भातील इच्छा सोशल मीडियावरुन बोलून दाखवली आहे. lalisasaura नावाच्या एक्स अकाऊंटवरुन "महिलांनो आपणही दक्षिण कोरियातील 4B सारख्या मोहिमेचा विचार केला पाहिजे. त्यामुळे अमेरिकेतली लोकसंख्येला उतरती कळा लागेल. लग्न नाही, मुलं नाही, पुरुषांना डे करायचं नाही आणि पुरुषांबरोबर लैंगिकसंबंधही ठेवायचे नाहीत. आपण पुरुषांना वाटेल तसं वागू देऊ शकत नाही. आपणच यासाठी पुढाकार घेतला पाहिजे," अशी पोस्ट केली असून ती प्रचंड व्हायरल झाली आहे. या पोस्टला साडेचार हजारांहून अधिक लाईक्स आणि 75 हजारांहून अधिक रिट्वीट मिळाले आहेत.
Ladies, we need to start considering the 4B movement like the women in South Korea and give America a severely sharp birth rate decline:
- no marriage
- no childbirth
- no dating men
- no sex with menWe can’t let these men have the last laugh… we need to bite back
— (@lalisasaura) November 6, 2024
अनेक महिलांनी जर दक्षिण कोरियातील महिला हे करु शकतात तर अमेरिकेतली प्रगत समाजामधील महिलांना हे सहज शक्य असल्याचं म्हटलं आहे. अर्थात काहींनी याला विरोध करत हे टोकाचं पाऊल असल्याचंही म्हटलं आहे.