Kaju Katli Maharashtra Connection: दिवाळीतील मिठाई असो किंवा कोणताही आनंदाचा क्षण असो अशावेळी हमखास काजूकतली दिली जाते. काजूकतली ही अनेकांच्या आवडीची मिठाई आहे. काजुकतली थोडी महाग असली तरीदेखील तिच्या चवीमुळं संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. मोठ्या आवडीने काजूकतली खात असाल तर तुम्हाला तिचा इतिहास तर नक्की माहिती असायला हवं. काजुकतलीचा शोध कोणी लावला व पहिल्यांदा ही मिठाई कोणी बनवली हे आज जाणून घ्या.
काजूकतलीचा शोध कोणी लावला याबाबत अनेक मतमतांतरे आहेत. काजूकतलीचा महाराष्ट्राशी थेट संबंध आहे, असंही म्हटलं जाते. 16व्या शतकात मराठा साम्राज्यातील शाही परिवारांसाठी काजुकतली बनवली जायची. शाही परिवारातील स्वयंपाकी (शेफ) यांनी सर्व प्रथम बनवला होता. भीमराव असं त्यांचे नाव असून त्यांनीच पहिल्यांदा काजुकतली बनवल्याचा उल्लेख आढळतो.
भीमराव यांना शाही परिवाराला खुष करण्यासाठी एक नवीन मिठाई बनवण्याचे काम सोपवण्यात आले होते. त्यावेळी भीमराव यांनी पारसी मिठाई हलुआ ए फारशीमध्ये थोडे बदल करुन नवीन मिठाई बनवली. त्यांनी पारसी मिठाईमध्ये बदामच्या ऐवजी काजुचा वापर केला आणि काजुकतलीचा शोध लागला.
अन्य एका मान्यतेनुसार, मुगल काळात काजूकतली बनवण्यात आल्याची नोंद आढळते. जहांगीरच्या शासनकाळात पहिल्यांदा काजुकतली बनवण्यात आली होती. असं म्हणतात की, शिख गुरुंच्या सन्मानार्थ शाही स्वयंपाकघरात काजुकतली बनवण्यात आली होती. जहांगीरच्या काळात शाही परिवारातील स्वयंपाकीने दिवाळीच्या दिवसात काजू, साखर आणि तूप घालून काजुकतली बनवली होती आणि परिसरात वाटण्यात आली होती. त्यादिवसांपासून ही मिठाई जगभरात प्रसिद्ध झाली.
काजुकतलीही पारंपारिक भारतीय मिठाई आहे. तसंच, घरी बनवणेदेखील खूप सोपे आहे. यात खूपप्रमाणात साखर असली तरीदेखील गुलाब जामुन आणि जिलेबीपेक्षा चांगली आहे. कारण दोन्ही मिठाई सुरुवातीला मैद्यापासून बनवले जातात आणि नंतर तेलात तळतात यात अतिप्रमाणात साखरदेखील असते.
1 कप काजू, 1/4 कप मिल्क पावडर,3/4 कप साखर,1/4 कप + 2 टेबलस्पून पाणी
काजूची बारीक पावडर करुन घ्या त्यानंतर चाळणीने पावडर चाळून घ्या त्यामध्ये आता मिल्क पावडर मिसळून घ्या. आता कढाईत साखर घालून थोडे पाणी टाकून पाक करुन घ्या. पाक दोन तारी झाल्यावर गॅस बंद करा आणि आता त्यात काजूचे मिश्रण घालून चांगले मिसळून घ्या. परत गॅस चालु करुन मिश्रणाचा गोळा तयार करुन घ्या.
मिश्रण गरम असतानाच बटर पेपरवर टाकून लाटून घ्या आणि तुम्हाला आवडत असेल तर चांदीचा वर्ख लावून वड्या पाडून घ्या तुम्हाला हवे असल्यास त्यावर बदाम किंवा केसरही वरुन घालू शकता.