Budget Wedding Tips : लग्नाचा सिझन सुरु झालाय, अवाढव्य स्टेज, पंचपक्वान्न, शाही कपडे आणि हिरेजडीत दागिने हे सध्या ट्रेंडमध्ये आहे. लग्न म्हटलं की, हा एवढा खर्च आलाच. पण अस असताना अनेकजण आहेत ज्यांना अतिशय साधेपणाने लग्न करायचं असतं. कोणताही टामझाम नाही किंवा मोठेपणाचा लवलेश नाही. अतिशय साधेपद्धतीने लग्न सोहळा करायचा असेल तर या 5 पद्धती नक्की फॉलो करा.
अनेकदा वेडिंग हॉलवर भरमसाठ खर्च केला जातो. अशावेळी मोकळ्या जागेची निवड करा. यामुळे वेन्यूला डेकोरेट करण्यासाठी फार खर्च करावा लागणार नाही. तसेच निसर्गाच्या सानिध्यात लग्न करा. एसी लावण्यापेक्षा नैसर्गिक गारवा महत्त्वाचा ठरेल. या ठिकाणी तुम्हाला जागेची कमतरता जाणवत नाही. तसेच मोकळ्या जागी सगळ्यांना मोकळेपणाने राहता येतं.
अनेक वेळा नववधु-वर लग्न एका ठिकाणी आणि रिसेप्शन दुसऱ्या ठिकाणी करतात. यामुळे प्रचंड खर्च होतो. असं न करता जर लग्न आणि रिसेप्शन या दोन्ही एकाच ठिकाणी केल्या तर खर्च वाचेल. कारण या दोन्ही ठिकाणं डेकोरेट करताना प्रचंड खर्च होतो. तसेच दोन दोन ठिकाणी जेवणाचा खर्च तसेच प्रवास करण्याचा खर्च देखील तितकाच वाढतो. या सगळ्याचा विचार करता तुम्ही एकाच ठिकाणी लग्न करणे अतिशय महत्त्वाचे असते.
अनेकदा नाईट वेडिंगचा ट्रेंड पाहायला मिळतो. पण यामध्ये खूप खर्च होतो कारण रात्रीचा झगमगाट निर्माण करण्यासाठी खूप खर्च करावा लागतो. एवढंच नव्हे तर दिवसाच लग्न केल्याने लाईटचा खर्च वाचतो. तसेच दिवसाचं लग्न केल्यास तुम्हाला राहण्याची व्यवस्था करावी लागत नाही.
लग्नाशी संबंधित प्रत्येक विधी आणि प्रथा वेगवेगळ्या ठिकाणी पार पडल्या पाहिजेत असे नाही. त्याऐवजी तुम्हाला हळद, मेहंदी यांसारखे विधी तुम्ही घरीही करू शकता. घरीच सगळे विधी केल्यावर घराशी असलेली आपली आठवण देखील अधिक घट्ट होते. प्रत्येकाचं घराशी एक वेगळं नातं असतं.
लग्नाच्या सजावटीवर पैसे वाचवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे स्थानिक साहित्य, फ्लेवर्स आणि पोत वापरणे. स्थानिक वस्तू खरेदी करताना पैशांची बचत होणार असून त्यांच्या वाहतुकीचा खर्चही वाचणार आहे. जेव्हा फुलं मोठ्या प्रमाणात खरेदी करावी लागतात आणि तीही लग्नसोहळ्याच्या निमित्ताने, तेव्हा त्यांची किंमत अनेक पटींनी वाढते. अशा परिस्थितीत महागडी विदेशी किंवा दुर्मिळ फुले न वापरता स्थानिक व हंगामी फुले वापरावीत. यावर तुम्ही खूप पैसे वाचवू शकता.