November Income Tax Calendar: 'या' 4 महत्त्वाच्या तारखा लक्षात आहेत ना? नाहीतर बसेल आर्थिक फटका

November Income Tax Calendar 2024: नोव्हेंबर महिन्यामध्ये करासंदर्भातील काही महत्त्वाच्या तारखा प्रत्येकाला ठाऊक असणं गरजेचं आहे. या तारखा कोणत्या आणि हा महिना संपण्याआधी करासंदर्भातील कोणती कामं पूर्ण केली पाहिजेत पाहूयात...

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 6, 2024, 08:01 AM IST
November Income Tax Calendar: 'या' 4 महत्त्वाच्या तारखा लक्षात आहेत ना? नाहीतर बसेल आर्थिक फटका  title=
जाणून घ्या या महिन्यातील महत्त्वाच्या डेडलाइन्स

November Income Tax Calendar 2024: आयकर विभागाच्या विविध करविषयक कामासाठी एक निश्चित कालमर्यादा ठरवून देण्यात आली आहे. याच कालमर्यादेला 'इन्कम टॅक्स कॅलेंडर' असे म्हटले जाते. या कालमर्यादा न पाळल्यास करदात्यांना दंड भरावा लागतो. आयकर परताव्याच्या दृष्टीने नोव्हेंबर महिना हा प्रत्येक करदात्यासाठी महत्त्वाचा असतो. नोव्हेंबर 2024 मधील 'इन्कम टॅक्स कॅलेंडर' बद्दल आणि महत्त्वाच्या तारखांबद्दल जाणून घेऊ या. तसेच आयकर परतावा भरणाऱ्यांसाठी या महिन्यामध्ये कोणत्या तारखांआधी कोणती कामं करणं आवश्यक आहे त्याची यादी पाहूयात...

> 7 नोव्हेंबर : ऑक्टोबर 2024 मध्ये कापलेला कर जमा करण्याची अंतिम तारीख आहे. या तारखेपर्यंत कर जमा केला नाही तर भुर्दंड बसू शकतो.

> 14 नोव्हेंबर : सप्टेंबर 2024 पर्यंत आयकर कलम 194-आयए, 194-आयबी, 194-एम आणि 194-एस अनुसार केलेल्या कपातीचे टीडीएस सर्टिफिकेट जारी करण्याची तारीख आहे. हे काम वेळेत पूर्ण करणं आवश्यक आहे. अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागेल.

> 15 नोव्हेंबर : सप्टेंबरला संपलेल्या तिमाहीतील टीडीएस सर्टिफिकेट (वेतनेतर उत्पन्न) जारी करण्याची अंतिम तारीख असून असं न केल्यास दंडाच्या रुपात आर्थिक फटका बसू शकतो.

> 30 नोव्हेंबर : ऑक्टोबरमध्ये कलम 194-आयए, 194-आयबी, 194-एम आणि 194-एस अनुसार कापण्यात आलेल्या कराशी संबंधित चालान-कम-स्टेटमेंट सादर करण्याची ही अंतिम तारीख आहे. इतर कामांप्रमाणेच हे कामही महत्त्वाचं असून याच महिन्यात पूर्ण करणं अधिक सोयीस्कर ठरेल.

> आयकर विवरण पत्र जमा करण्याची तारीख 30 नोव्हेंबर 2024 असल्यास नियम 5 डी, 5 ई आणि 5 एफ अनुसार वैज्ञानिक संशोधन संस्था, विद्यापीठे, महाविद्यालये अथवा विशिष्ट संशोधक कंपनी यांना स्टेटमेंट सादर करावे लागणार आहे. असं न करणाऱ्या कंपन्यांना आर्थिक दंड बसू शकतो.

या तीन गोष्टीही नोव्हेंबरमध्येच उरकून घेणं उत्तम ठरेल

> आर्थिक वर्ष 2023-24 मधील वितरित उत्पन्नाशी संबंधित व्हेंचर कॅपिटल कंपनी अथवा व्हेंचर कॅपिटल फंड यांच्याकडून इन्कम डिस्ट्रिब्युशन स्टेटमेंट सादर करणे आवश्यक आहे.

> आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये यूनिट होल्डर्सना बिझनेस ट्रस्टकडून वितरित उत्पन्नाचा तपशील सादर करणे आवश्यक आहे.

> कंपनी कलम 35 (2 एबी) अनुसार वेटेज डिडक्शनसाठी पात्र असेल आणि कंपनीचे काही आंतरराष्ट्रीय अथवा देशांतर्गत विशेष व्यवहार असल्यास तिला अकाउंट ऑडिटची प्रत सेक्रेटरीस द्यावी लागेल.