पूर्वजांपासून चालत आलेली 'आषाढ तळण' प्रथा म्हणजे नेमकी काय? का खाल्ले जातात तेलकट पदार्थ?

Ashadha Talan: आषाढ महिना सुरू झाला की तळणीचे पदार्थ केले जातात. याला आषाढ तळण असं म्हणतात, म्हणजे नक्की काय जाणून घेऊया.   

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 11, 2024, 11:17 AM IST
पूर्वजांपासून चालत आलेली 'आषाढ तळण' प्रथा म्हणजे नेमकी काय? का खाल्ले जातात तेलकट पदार्थ? title=
health tips in marathi what is Ashadha Talan eat these food in monsoon

Ashadha Talan: आपल्या देशात तीन ऋतु असतात. प्रत्येक ऋतुनुसार त्या त्या प्रांताच्या रिती रिवाजानुसार तसे खाद्यपदार्थ बनवून खाल्ले जातात. प्रत्येक ऋतुचे एक वेगळे महत्त्व आहे. त्यामुळं आपल्या पूर्वजांनी या ऋतुंचे महत्त्व अधोरेखितही करुन ठेवलं आहे. ऋतुनुसार काही आहार घ्यावे, असं आपले पूर्वजही सांगायचे. आरोग्याच्या दृष्टीनेदेखील हे खूप महत्त्वाचे आहे. आता पावसाळा सुरू झाला आहे. नुकताच आषाढ महिनाही लागला आहे. आषाढ महिना आला की तळलेले पदार्थ जास्त खाल्ले जातात. यालाच आषाढ तळण असं म्हटलं जातं. गावातदेखील गृहिणी एकमेकींना आषाढ तळण उरकून घ्या, असं सांगत असतात. आषाढ तळण म्हणजे काय? जाणून घेऊया. 

आषाढ महिन्यातील पाऊस हा जास्त प्रमाणात असतो. त्यामुळं वातावरणातील आद्रता तसेच थंडावा वाढलेला असतो. त्यामुळं आषाढात पचनास हलके असलेल्या पदार्थाचे सेवन केले जाते. आषाढात पचनशक्ती कमी झाल्यामुळं स्निग्ध पदार्थाचे सेवन केले जातात. त्यामुळं आषाढात तळलेले पदार्थ खाल्ले जातात. आषाढात नवीनच लग्न झालेल्या मुलीला माहेरी आणले जाते. तिला तेलकट पदार्थ करुन दिले जातात. तिची चांगली बडदास्त ठेवली जाते. 

आषाढ महिन्यात पाऊस जास्त पडत असतो. नदी-तलाव ओसंडून वाहू लागलेले असतात. अशावेळी पाणी प्रदूषित होण्याची शक्यताही असते. शरीरात दूषित पाणी गेले तर आरोग्य बिघडते अशावेळी शरीराला वंगण मिळावे यासाठी तेलकट पदार्थांचे सेवन केले जाते. 

पावसाळ्यात हवेत गारवा असतो अशावेळी तेलकट आणि उष्ण पदार्थ खाल्ल्यास शरीराला उष्णता पुरवण्याचे काम करतात. त्यामुळंच या काळात पदार्थ तळले जातात. 

मे महिन्यात केलेले वाळणवणाचे पदार्थ पापड, कुरडया, सांडगे, शेवया या आषाढापासून खाण्यास सुरुवात करतात. तसंच, श्रावणात अनेक व्रत वैकल्यांमुळं खाण्यावर निर्बंध येतात त्यामुळं आषाढात याची कसर भरुन काढण्यात येते. तळणीचे पदार्थ खावून अपचन होऊ नये यासाठी मूगाची खिचडीदेखील केली जाते. त्याचबरोबर, या काळात लहान मुलांना सर्दी-खोकला होऊ नये म्हणून आलेपाक वडी खाल्ली जाते. 

आषाढात हे पदार्थ प्रामुख्याने केले जातात

आषाढ महिन्यात गोड पुऱ्या, तिखट मिठाच्या पुऱ्या, कापण्या, राजगिरा लाजू, थालीपीठ, मुगाची भजी, रव्याचे लाडू, नारळाचे लाडू, भाजणीचे थालीपीठ, खारे शंकरपाळे, चकल्या, शेव, कडबोळी, असे पदार्थ आवर्जून केले जातात. आषाढात इतके सगळे पदार्थ केल्यानंतर त्याचा नैवेद्य अन्नपूर्णा देवीला दाखवला जातो. तिची पूजादेखील केली जाते. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)