मुली वयात येतात तेव्हा त्यांच्याबाबतीत पालक खूप जास्त सजग असतात. विशेषतः मुलीची आई. मुलगी वयात येत असताना तिच्या शरीरात अनेक बदल होत जातात. अशावेळी आई तिला अनेक चांगल्या-वाईट गोष्टी समजून सांगते. तसंच, मुलीच्या शरीरातील बदलही दिसून येतात.त्याचप्रमाणे मानसिक बदलही होत असतात. अशावेळी आई-वडिल दोघही मुलींना मार्गदर्शन करतात. त्यांना समजून सांगतात. मुलींच्या शरीरातील सर्वात मोठा बदल म्हणजे मासिक पाळी. या दिवसांत तिला समजून घेणे खूप गरजेचे असते. पण मुलींबरोबर मुलं वयात येताना त्यांनाही समजून घेणे व त्यांच्याशी संवाद साधणे खूप गरजेचे असते. पौंगडावस्थेचा हा काळ मुलं आणि मुली या दोघांसाठी खूप आव्हानात्मक असतो. वयात येणाऱ्या मुलींसोबत जसं बोलतो तसंच, पौंगडावस्थेतील मुलांच्या मनातही इमोशनल चढउतार होत असतात. मुलं वयात येताना पालकांनी त्यांच्याशी कसा संवाद साधायचा हे जाणून घेऊया.
मुलं वयात असताना त्यांच्याही शरिरात बदल होत असतात. मानसिक व शारिरीक असे दोन्ही प्रकारचे बदल होत असतात. मुलांचा आवाज फुटतो, टेस्टिकल्स आणि पेनीसचा आकार वाढणे, तसेच चेहऱ्यावर केस व छातीवर केस येणे, त्यांची उंचची वाढते, चेहऱ्यावर मुरुम येतात इतकंच नव्हे तर आकर्षण हा सुद्धा महत्त्वाचा बदल या वयात होतो. लहान असताना ज्या मुलीशी खेळायचो आता तिच्याशी बोलतानाही ऑकवर्ड होतो. मुलीकडे पाहून मनात विचार येतात. हे सगळे बदल मुलं त्यांच्या मित्रांशी बोलतीच असं नाही. तसंच, मित्रही त्यावर त्यांना योग्य सल्ला देतातच असं नाही. मित्रांची संगत वाईट असेल तर नुकतच आकार घ्यायला सुरुवात केलेल्या मनात चुकीच्या गोष्टी पेरल्या गेल्या तर त्याचा परिणाम वर्तवणुकीत दिसून येतो. त्यामुळं या वयात पालकांनी मुलांशी संवाद साधणं खूप गरजेचं आहे.
हल्ली सगळ्यांच मुलांकडे मोबाईल फोन आहे.त्यामुळं मोबाईलवर नको ते सर्च करुन त्याचाही परिणाम मुलांवर होऊ शकतो. वयात येणारी मुलं कदाचित आईकडे या गोष्टी मनमोकळेपणाने बोलणार नाहीत. पण बाबांशी या विषयांवर नक्कीच बोलू शकतात. त्यामुळं या विषयांवर बाबाने मुलांसोबत संवाद साधणे गरजेचे आहे. मुलांशी संवाद साधताना या गोष्टींकडे लक्ष द्या.
मुलांच्या हातात फोन असतो अशावेळी त्यांनी त्यावर काही भलतं सर्च करण्याआधी त्यांच्याशी बोलायला हवं.
मुलांचा आवाज फुटतो तेव्हा त्यांना त्रास होत असेल तर अशावेळी त्यांच्या शरीरात नेमके काय बदल होतात, हे समजावून सांगा. पौंगडावस्था म्हणजे काय याची शास्त्रीय कारण त्यांना सांगा
एखादी मुलगी आवडत असेल तर कसं वागायचं. तिला कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी कशी घ्यायची
मुलींशी-महिलांशी आदरानं वागलं पाहिजे. त्यांचा अपमान होईल किंवा दुखावल्या जातील असं वागू नये.
एखादी मुलगी नाही म्हणाली तर त्याचा अर्थ नाहीच होतो, हे मान्य करता यायला हवं.
मुलांसोबत रोजचा संवाद साधा. तो कोणासोबत फिरतो, त्याच्या मित्रांची संगत कशी आहे. मोबाईलवर काय पाहतो हे त्याच्याकडून जाणून घ्यायचा प्रयत्न करा.