Om Chanting Benefits On Physical And Mental Health : धकाधकीच्या या आयुष्यामध्ये अनेकदा अध्यात्मक आणि तत्सम गोष्टींचा आधार घेणारे अनेकजण तुम्ही पाहिले असतील. किंबहुना तुमच्यापैकी कित्येकांनी अध्यात्माची वाट धरलीसुद्धा असेल. सततच्या अपेक्षा, निराशा, सतत एखाद्या गोष्टीमागे धावणं, जिंकणं, पराभूत होणं, कुरघोडी करू पाहणं या साऱ्यामध्ये बऱ्याचदा मनुष्य आनंदी होणं आणि समाधानी होणं विसरून जातो. अशा वेळी नेमकं काय करावं? अनेक तज्ज्ञ आणि जाणकारांच्या मते अशा वेळी शांत चित्तानं काही निर्णय घेणं बरंच मदतीचं ठरतं.
ॐ चा उच्चार करत ध्यानधारणा करणं हा त्याचाच एक भाग. ओम किंवा अऊमला भारतामध्ये, योगसाधनेत, हिंदुत्वामध्ये आणि बौद्ध धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्वं आहे. अनेक अध्यात्मिक संदर्भांमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार ॐ मध्ये अस्तित्वाचं महत्त्वं दडलं आहे. ॐ संदर्भातील अनेक सिद्धांच आजवर मांडले गेले आहेत. पण, त्याचे फायदे तुम्हाला माहितीयेत?
श्वसनक्रिया सुधारते
श्वसनविकार असणाऱ्या अनेकांना ॐचा उच्चार केल्यामुळं फायदा होतो. यामुळं दमा, फुफ्फुसांच्या विकारांमुळं होणारा त्रास कमी होतो असं म्हटलं जातं. ॐ काराच्या उच्चारामुळं रक्तदाब नियंत्रणात राहून हृदयाचे ठोकेही नियंत्रणात राहतात. इतकंच नव्हे, तर पचनक्रिया आणि हृदयाचं आरोग्य उत्तम राहतं.
रोगप्रतिकारक शक्ती सुधारते
सातत्यानं सुरु असणाऱ्या अभ्यासानुसार ओम उच्चारामुळं श्वसनक्रिया लयबद्ध राहते. ज्यामुळं तणाव निर्माण करणारे हार्मोन्स कमी तयार होतात आणि शरीर आनंदी राहतं. शरीरातील रोगप्रतिकारक उतींचं आरोग्य ओम च्या उच्चारामुळं सुधारतं, ज्यामुळं रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.
एकाग्रता सुधारते
सतत ॐ चा उच्चार केल्यामुळं एकाग्रता वाढते. शरीराला सकारात्मक उर्जा जाणवून दृष्टीकोनही सकारात्मक होतो. वर्तमानात राहत एककेंद्री होण्यास ॐ चा उच्चार मदत करतो.
भावनिक आधार
ॐ च्या उच्चारणामुळं शरीर शुद्धीकरण होतं अशी धारणा आहे. यामुळं शरीरातील नकारात्मक उर्जा आणि नकारात्मक भावना नाहीशा होऊन सकारात्मकतेला वाव मिळतो. शरीरात आनंदाची भावना तयार करणाऱ्या समीकरणांना ॐ च्या उच्चारामुळं वाव मिळतो आणि व्यक्तीला भावनिक आधार मिळतो.
अध्यात्मिक सजगता वाढते
असं म्हणतात की ॐ हा एक बीजमंत्र असून, त्यामुळं शरीराच्या मस्तकी असणारं चक्र सक्रिय होतं. यामुळं तुमच्या शरीरात अध्यात्मिक उर्जेला वाव मिळतो. ॐ च्या उच्चारामुळं अध्यात्मिक सजगता वाढते.
(वरील माहिती सर्वसामान्य संदर्भ आणि मान्यतांवर आधारित असून, झी 24 तास त्याची खातरजमा करत नाही.)