मुंबई : Delta Plus News : कोरोनाचा धोका अद्याप कमी झालेला नाही. त्यामुळे डिसेंबर 2022पर्यंत सोशल डिस्टन्सिंग पाळणे आणि मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबत कोरोना टास्क फोर्सने माहिती दिली आहे. त्याचवेळी 5 सप्टेंबरआधी शिक्षकांचे लसीकरण करा, असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. दरम्यान, महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात डेल्टा प्लसचा (Delta Plus variant) 24 जिल्ह्यांमध्ये प्रादुर्भाव झाला आहे. राज्यातील रुग्णांची संख्या 103वर पोहोचली आहे. त्यामुळे बारकाईनं लक्ष ठेवण्याचं तज्ज्ञांचं मत आहे. (Delta Plus variant 103 Patient in Maharashtra)
राज्यातील 24 जिल्ह्य़ांमध्ये डेल्टा पल्स या कोरोनाच्या व्हेरिएंटचा प्रादुर्भाव झाला आहे. यात 50 टक्के रुग्ण हे विदर्भ आणि कोकण विभागातले आहेत. यात सर्वाधिक रुग्ण रत्नागिरी आणि जळगाव जिल्ह्यामध्ये आढळले असले तरी त्या तुलनेत इथे बाधितांचे प्रमाण वाढलेले नाही. त्यामुळे डेल्टा प्लसच्या प्रसाराचा वेग हा डेल्टाच्या तुलनेत कमी आहे. असे असले तरी खबरदारी घेणे गरजेचे आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
भारतातील कोरोनाव्हायरसचे (Coronavirus in India) संकट पुन्हा एकदा गडद होऊ लागले आहे आणि गेल्या 2 दिवसात नवीन प्रकरणांमध्ये 21 हजारांहून अधिक वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात कोविड -19 ची 46397 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत, तर यापूर्वी मंगळवारी (24 ऑगस्ट) 25467 नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली होती.
वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांमध्ये, भारतात कोरोनाव्हायरसची 46397 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत, तर या काळात 608 लोकांचा मृत्यू झाला आहे. यानंतर, देशात संक्रमित लोकांची संख्या 3 कोटी 25 लाख 57 हजार 767 वर गेली आहे आणि 4 लाख 36 हजार 396 लोकांनी आपला जीव गमावला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोविड -19 चे 34420 लोक बरे झाले आहेत, त्यानंतर बरे झालेल्यांची संख्या 3 कोटी 17 लाख 81 हजार 46 पर्यंत वाढली आहे आणि 3 लाख 40 हजार 325 लोकांवर उपचार सुरू आहेत.