शाळेकडून 'वॉटर थेरपी' जीवावर बेतली, 14 वर्षांचा मुलगा पोहायला गेला अन् परतलाच नाही...; गोरेगावमधली घटना

Mumbai News Today: शाळेकडून विशेष मुलांसाठी वॉटर थेरपीचे प्रशिक्षण देण्यात येत असतानाच एका मुलावर मृत्यू ओढावला आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 24, 2023, 02:49 PM IST
शाळेकडून 'वॉटर थेरपी' जीवावर बेतली, 14 वर्षांचा मुलगा पोहायला गेला अन् परतलाच नाही...; गोरेगावमधली घटना title=
14 years old Spl child in pool for water therapy dies

मुंबईः स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचे प्रशिक्षण घेत असलेल्या 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. गोरेगावच्या गोकुळधाम शाळेत शुक्रवारी ही घटना घडली आहे. शवविच्छेदनानंतरच त्याच्या मृत्यूचे कारण समोर येणार आहे. दरम्यान, मुलाची प्रकृती चिंताजनक असूनदेखील दोन रुग्णालयांनी त्याच्यावर उपचार करण्यास नकार दिल्याचा आरोप त्याच्या पालकांनी केला आहे. 

शार्दुल संजय आरोलकर असं मृत मुलाचे नाव असून तो यधोधाम शाळेत नववी इयत्तेत शिकत होता. गोरेगाव येथील गोकुळधाम हायस्कुलच्या स्विमिंग पूलमध्ये पोहत असताना त्याच्यावर मृत्यू ओढावला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून शार्दुल गोकुळधाम शाळेत तो नियमित पोहण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी जात होता. 

शाळेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विशेष मुलांसाठी शाळेने वॉटर थेरपी सुरू केली होती.  मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी यूएस-प्रमाणित प्रशिक्षकासह चार प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. तसंच, शार्दुल हा उत्तम जलतरणपटू होता.  

शुक्रवारी 12.30 ते 2.30 च्या दरम्यान शार्दुल चार विद्यार्थ्यांसह पोहण्यासाठी गेला होता.  अर्धातास पोहोचल्यानंतर एका प्रशिक्षकाचे त्याच्याकडे लक्ष गेले तेव्हा त्याची पोहण्याची गती संथ झाली होती. काहीतरी चुकीचं घडेल या भीतीने प्रशिक्षकाने त्याच्याकडे धाव घेतली. तेव्हा शार्दुल खूप थकल्यासारखा वाटत होता. प्रशिक्षकाने त्याला पाण्याबाहेर काढले. व त्याला सीपीआर दिला. जेव्हा ही घटना घडली तेव्हा शार्दुलची आईदेखील तिथेच उपस्थित होती. शार्दुलची तब्येत बिघडल्यावर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. 

शार्दुलची प्रकृती चिंताजनक असतानाही त्याला दोन रुग्णालयात दाखल करुन घेण्यास नकार दिला, असा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे. संजय आरोलकर हे दिंडोशी कोर्टात नोकरीला आहेत. 

सुरुवातीला शार्दुलला गोरगावयेथील खासगी रुग्णालयात नेले होते. मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला शताब्दी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. तसंच, शार्दुलला पोहायला येत होते तरीदेखील तो कसा बुडाला? हे शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर समोर येईल, असं पोलिसांनी म्हटलं आहे. 

विशेष मुलाकडे जास्त लक्ष देण्याची आणि काळजी घेण्याची गरज आहे, असं शार्दुलच्या वडिलांनी म्हटलं आहे. तसंत, घटनेनंतर शाळेच्या व्यवस्थापनाकडून कोणीही अद्याप कुटुंबाला सांत्वनापर भेट दिलेली नाहीये.