'25 वर्षांसाठी जनता तुम्हाला...'; 'अपक्षांसाठी हेलिकॉप्टर तयार'वरुन ठाकरेंच्या सेनेचा महायुतीला टोला

Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024: शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक असून दोन्ही पक्षांमधील दोन्ही गट वेगवेगळ्या बाजूंनी एकमेकांविरुद्ध लढत आहेत.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 23, 2024, 07:56 AM IST
'25 वर्षांसाठी जनता तुम्हाला...'; 'अपक्षांसाठी हेलिकॉप्टर तयार'वरुन ठाकरेंच्या सेनेचा महायुतीला टोला title=
ठाकरेंच्या प्रवक्त्यांच्या टोला (प्रातिनिधिक फोटो)

Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच बहुमतासाठीची जुळावजुळव सर्वच प्रमुख पक्षांनी सुरु केली आहे. एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये चुरशीची लढाई होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळेच बहुमताचा आकडा गाठण्याच्या उद्देशाने निकाल लागण्याच्या आधीपासूनच अपक्ष उमेदवारांना आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न दोन्ही गटांकडून सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी हॉटेलच्या रुम आणि हेलिकॉप्टर, विमानांची सोय करुन ठेवण्यात आली आहे. निकाल हाती येताच आमदारांची फाटाफूट होऊ नये या उद्देशाने त्यांना सुरक्षित स्थळी हलवलं जाणार आहे. स्वपक्षीय आमदारांबरोबर समर्थन देणाऱ्या अपक्ष आमदारांची बडदास्त ठेवली जाईल असं चित्र निकालाआधीच दिसत आहे. मात्र यावरुनच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपाला टोला लगावला आहे.

25 वर्षांच्या सुट्टीवर पाठवणार

शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदींनी भारतीय जनता पार्टीला शाब्दिक चिमटा काढला आहे. महाराष्ट्रातील जनता भाजपासहीत महायुतीला 25 वर्षांच्या सुट्टीवर पाठवणार असल्याचं विधान प्रियंका यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना केलं आहे. भाजपाने बरीच तयारी करुन ठेवल्याचा उल्लेख करत प्रियंका यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना प्रियंका यांनी, "हॉटेल आणि हेलिकॉप्टर बूक करण्याची गरज नाही महाराष्ट्रातील जनता त्यांना पुढील 25 वर्षांसाठी सुट्टीवर पाठवणार आहे. ज्या पद्धतीची लूट त्यांनी लावली आहे, ज्या पद्धतीने भ्रष्टाचार झाला आहे, ज्या पद्धतीने अदानीचं सरकार चाललं आहे ते पाहता जनता आम्हाला बहुमत देईल," असा विश्वास व्यक्त केला आहे.

...आणि त्यांना पळच काढावा लागेल

"आम्हाला स्पष्ट बहुमत मिळेल. आम्ही जनतेच्या सेवेत पुढील पाच वर्ष काम करु. कायदा सुव्यवस्था, शेतकऱ्यांचे प्रश्न, महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न, इतर राज्यांमध्ये पाठवलेले उद्योग हे सर्व प्रश्न निकाली निघतील. कदाचित यांनी यासाठी हेलिकॉप्टर बूक केले आहेत की त्यांना ठाऊक आहे जेव्हा जनता त्यांना पराभूत करेल तेव्हा लेखाजोखा विचारेल आणि त्यांना पळच काढावा लागेल," असं प्रियंका चतुर्वेदींनी म्हटलं आहे.

25 वर्षांसाठी सुट्टीवर

हॉटेल आणि हेलिकॉप्टर बूक करण्याची गरज नाही महाराष्ट्रातील जनता त्यांना पुढील 25 वर्षांसाठी सुट्टीवर पाठवणार आहे. ज्या पद्धतीची लूट त्यांनी लावली आहे, ज्या पद्धतीने भ्रष्टाचार झाला आहे, ज्या पद्धतीने अदानीचं सरकार चाललं आहे ते पाहता जनता आम्हाला बहुमत देईल असा विश्वास प्रियंका चतुर्वेदींनी व्यक्त केला आहे. आम्हाला स्पष्ट बहुमत मिळेल. आम्ही जनतेच्या सेवेत पुढील पाच वर्ष काम करु. कायदा सुव्यवस्था, शेतकऱ्यांचे प्रश्न, महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न, इतर राज्यांमध्ये पाठवलेले उद्योग हे सर्व प्रश्न निकाली निघतील. कदाचित यांनी यासाठी हेलिकॉप्टर बूक केले आहेत की त्यांना ठाऊक आहे जेव्हा जनता त्यांना पराभूत करेल तेव्हा लेखाजोखा विचारेल आणि त्यांना पळच काढावा लागेल.

महायुतीच्या बाजूने कल

दरम्यान, महाराष्ट्रातील एक्झिट पोलमध्ये महायुतीच्या बाजूने कल राहील असा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र महाविकास आघाडी त्यांना अटीतटीचं आव्हान देईल असं आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. त्यामुळेच दोन्ही बाजूंनी आधीपासूनच अपक्ष आमदारांना आपल्या बाजूने वळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. जे अपक्ष आमदार जिंकू शकतात त्यांच्यावर दोन्ही गटांची नजर असून त्यांच्याशी संपर्क साधल्याची जोरदार चर्चा आहे.