जनआशीर्वाद यात्रेदरम्यान २५ शिवसेना नेत्यांची पाकिटं लंपास

आदित्य ठाकरेंच्या रॅलीत चोरांची हातसफाई

Updated: Aug 30, 2019, 03:44 PM IST
जनआशीर्वाद यात्रेदरम्यान २५ शिवसेना नेत्यांची पाकिटं लंपास title=

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : आदित्य ठाकरेंच्या रॅलीला मोठी गर्दी झाली होती. पण त्या रॅलीतली धक्कादायक बातमी नंतर समोर आली. शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी घरी जाऊन पाहिलं तर त्यांच्या खिशात पाकिट नव्हतं. त्यानंतर रॅलीत पाकिट मारलं गेल्याचं नेत्यांच्या लक्षात आलं. आदित्य ठाकरेंची जनआशीर्वाद यात्रेत चोरट्यांनी हात साफ केला. जनआशीर्वाद यात्रेत चोरटे सुसाट झाल्याचं पाहायला मिळालं. 

२७ ऑगस्टला आदित्य ठाकरेंची जनआशीर्वाद यात्रा नागपुरात आली होती. विमानतळावर स्वागत झाल्यावर नागपुरातल्या चौकाचौकातून यात्रा निघाली. कार्यकर्ते जोशात आणि चोरटेही जोमात अशी परिस्थिती होती. चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत २५ नेत्यांची पाकिटं लंपास केली.

नागपूर शहरातल्या माटे चौक, नागपुरलगतच्या वाडी शहर, फेटरी गाव, कळमेश्वर शहर अशा ठिकाणी खिसे कापण्याच्या घटना घडल्या आहेत. या सगळ्या प्रकरणात चोरट्यांनी तब्बल दोन ते अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे.