एटीएमद्वारे फसवणूक करणाऱी टोळी जेरबंद

एटीएमच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या चार अट्टल गुन्हेगारांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीने देशात ग्रामीण भागातील अनेक नागरिकांना जवळपास ५० लाखांना गंडवल्याच निष्पन्न झाल असून यांच्या कडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. 

Updated: Nov 2, 2017, 08:36 PM IST
एटीएमद्वारे फसवणूक करणाऱी टोळी जेरबंद title=

विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : एटीएमच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या चार अट्टल गुन्हेगारांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीने देशात ग्रामीण भागातील अनेक नागरिकांना जवळपास ५० लाखांना गंडवल्याच निष्पन्न झाल असून यांच्या कडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. 

औरंगाबाद ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात असलेल्या या आरोपींनी ग्रामीण भागातील गोर गरिबांना लाखोंचा गंडा घातलाय. एटीएमच्या बाबतीत अशिक्षित किंवा कमी ज्ञान असलेल्या नागरिकांना हेरून हे लोक फसवणूक करत होते. ग्रामीण भागात एटीएममधे पैसे काढायला गेलेल्या लोकांवर ही टोळी लक्ष ठेवत होती. 

एखादा अशिक्षित वाटला तर त्याला मदत करण्याच्या उद्देशानं त्या व्यक्तीचं एटीएम घेत होते. संबंधित व्यक्तीनं आपला पासवर्ड टाकला की टोळीतील एकजण तो लक्षात ठेवायचा आणि त्यानंतर मशीन खराब असल्याचं कारण देत एटीएम परत देत होते. मात्र एटीएम देत असताना ते बदलून देत होते आणि नंतर त्याच व्यक्तीच्या एटीएममार्फत त्यांच्या खात्यावरील सर्व रक्कम काढून त्याची फसवणूक करत असल्याचं निष्पन्न झालं. 

अटक केलेल्या या आरोपींनी जवळपास शंभराहून अधिक नागरिकांना 50 लाखांहून अधिक रुपयांना फसवल्याचं पोलीस तपासात समोर आलं असून या आरोपींकडून पोलिसांनी 50 पेक्षा अधिक एटीएम जप्त केलेत. 

पकडलेल्या आरोपींनी राज्यात नाही तर देशात अनेकांची फसवणूक केल्यानं प्रथमदर्शनी लुटीची रक्कम वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं इतर राज्यात देखील पोलीस तपास करणारेत.