गोंदिया : गोंदिया रेल्वे पोलिसांनी बॅगेत जवळपास १० किलो सोनं घेऊन जाण्याऱ्या एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. रेल्वे पोलीस स्टेशनवर गस्त घालत असताना, त्यांना एक व्यक्ती संशयितरित्या फिरत असताना आढळला. पोलिसांनी त्याची चौकशी केल्यावर, त्याने उडवा-उडवीची उत्तरं दिलं. मात्र, पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर पोलिसांना त्याच्या बॅगेत तब्बल १० किलो सोनं सापडलं.
गोंदिया रेल्वे स्टेशनवर सकाळी ११ वाजता विदर्भ एक्स्प्रेस गाडी आली असता, रेल्वे पोलीस प्रवाशांच्या सुरक्षेकरिता गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना संशयित व्यक्तीकडे एका बॅगेत, पाच जेवणाच्या डब्ब्यांमधून सोनं सापडलं. पोलिसांनी इतक्या सोन्याबाबत चौकशी, कागदपत्रांची विचारणा केली. मात्र तो कोणतीही कागदपत्र देऊ शकला नाही. पोलिसांच्या चौकशीवर त्याने उडवा-उडवीची उत्तरं दिल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.
संशयित व्यक्तीकडून जवळपास १० किलो सोन्याचे दागिने आढळून आले. याची किंमत दोन कोटींच्या आसपास आहे. गोंदिया रेल्वे स्टेशनवर एवढ्या मोठ्या प्रमाणात सोने पकडण्याची ही पहिलीच कारवाई असल्याचं बोललं जात आहे