महाराष्ट्रातील प्रवाशांनी भरलेली बस नेपाळमध्ये नदीत कोसळली; 14 जण ठार

Nepal Bus Accident: नेपाळमध्ये भारतीय प्रवाशांनी भरलेली बस नदीत कोसळली आहे. हे सर्व प्रवासी महाराष्ट्रातील होते. या दुर्घटनेत 14 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.   

शिवराज यादव | Updated: Aug 23, 2024, 03:03 PM IST
महाराष्ट्रातील प्रवाशांनी भरलेली बस नेपाळमध्ये नदीत कोसळली; 14 जण ठार title=

Nepal Bus Accident: नेपाळमध्ये भारतीय प्रवाशांनी भरलेली बस नदीत कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 14 प्रवासी ठार झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नेपाळ पोलिसांनी दुजोरा दिला आहे की, 40 प्रवासी प्रवास करत असलेली बस तानाहून जिल्ह्यातील मार्स्यांगडी नदीत कोसळली आहे. हे सर्व प्रवासी महाराष्ट्रातील जळगावातील जिल्ह्यातील आहेत. 

महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील भुसावळ गावातून 104 लोकांचा एक गट 10 दिवसांच्या दौऱ्यासाठी दोन दिवसांपूर्वी नेपाळमध्ये आला होता. हा गट तीन बसमधून प्रवास करत होता. त्यांनी पहिले दोन दिवस पोखराला भेट दिली. शुक्रवारी काठमांडूसाठी रवाना झालेल्या या तीन बसपैकी एक बस मार्स्यांगडी नदीत दुर्घटनाग्रस्त झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बसमध्ये बहुसंख्य प्रवासी हे कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक होते.

“UP FT 7623 क्रमांकाची बस नदीत कोसळली आहे. बस सध्या नदीच्या काठावर पडलेली आहे,” अशी माहिती जिल्हा पोलिस कार्यालय तानाहुनचे डीएसपी दीपकुमार राया यांनी दिली आहे. ही बस पोखराहून काठमांडूकडे जात होती असा अंदाज आहे. मात्र अधिक तपशील देण्यात आलेला नाही. 

दरम्यान काठमांडू स्थित भारतीय दुतावासाने नेपाळमध्ये भारतीय पर्यटकांच्या बसला झालेल्या अपघाताबाबत माहिती मिळवण्यासाठी हेल्पलाइन नंबर जारी केला आहे. दूतावासाच्या अधिकृत एक्स अकाउंटवर हा नंबर जारी करण्यात आला आहे. यासंदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती मिळवण्यासाठी जारी केलेला हेल्पलाइन नंबर आहे 9779851107021 असा आहे.