पाण्याच्या टँकरमधून पाणी येत नसल्याने वर चढून पाहिलं तर...; पुण्यातील खळबळजनक घटना

पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. फुरसुंगी येथील पॉवर हाऊसजवळ पाणी सोडत असताना हा प्रकार समोर आला आहे.   

शिवराज यादव | Updated: Jun 20, 2024, 02:58 PM IST
पाण्याच्या टँकरमधून पाणी येत नसल्याने वर चढून पाहिलं तर...; पुण्यातील खळबळजनक घटना title=

पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. फुरसुंगी येथील पॉवर हाऊसजवळ पाणी सोडत असताना हा प्रकार समोर आला आहे. थेट पाण्याच्या टँकरमध्ये मृतदेह आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. यानंतर लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. दरम्यान हा खून आहे की आत्महत्या याबाबत पोलिसांकडून तपास केला जात आहे.

मृतदेहाची ओळख पटली आहे. कौशल्या मुकेश चव्हाण असं या महिलेचं नाव आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात महिला हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. यानंतर टँकरमध्ये तिचा मृतदेह आढळल्यानंतर वेगवेगळे संशय व्यक्त केले जात आहेत. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. 

पाण्याचा टँकर फुरसुंगी भागात पाणी सोडण्यासाठी पोहोचला होता. यावेळी टँकरमधून पाणी येत नसल्याने वरती चढून पाहिलं असता सगळेच चक्रावले. याचं कारण टँकरमध्ये चक्क एका महिलेचा मृतदेह तरंगत होता. हे चित्र पाहिल्यानंतर एकच खळबळ उडाली. 

मिळालेल्या माहितीनुसार, महिला घरातून बेपत्ता होती. याप्रकरणी नवऱ्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. महिला घऱातून निघून गेली होती असं नवऱ्याचं म्हणणं आहे. दरम्यान महिलेची हत्या झाली की आत्महत्या यासंबंधी पोलीस तपास करत आहेत. तसंच मृतदेह टँकरपर्यंत कसा पोहोचला याचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे. पोलिसांनी याप्रकरणी नवरा, नातेवाईकाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.