Crime News: बीडमध्ये (Beed) एका तीन वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार (Rape) करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. मुलगी रस्त्यावर आपल्या आईसह भीक मागत बसलेली असताना तळपायाची आग मस्तकात नेणारी ही घटना घडली आहे. आरोपीने छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलातील शौचालयात चिमुरडीवर बलात्कार केला. पोलिसांनी याप्रकरणी अल्पवयीन आरोपीला (Accused) ताब्यात घेतलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित चिमुरडीची आई अंध असून रस्त्यावर भीक मागते. मुलगी रस्त्यावर आपल्या आईसह बसलेली होती. मंगळवारी (21 फेब्रुवारी) रात्री मुलगी आपल्या आईच्या शेजारी खेळत असताना अल्पवयीन आरोपीने पैसे दाखवत तिला जवळ बोलावलं. यानंतर त्याने तिला संभाजी महाराज क्रीडा संकुलातील शौचालयात नेलं आणि हात बांधून लैंगिक अत्याचार केले.
मुलगी रडत असल्याने आवाज ऐकून तेथून जाणाऱ्या काही पादचाऱ्यांनी जाऊन पाहिलं असता आरोपीने पळ काढला. पीडित मुलीच्या कपड्यांवर रक्ताचे डाग असल्याने तिच्यावर अत्याचार झाल्याचं लक्षात आलं. लोकांनी आरोपीचा पाठलाग करत त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, पण तो फरार झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. मुलीला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, उपचार सुरु आहेत. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यानंतर पोलीस अधिकारी रात्रभर पोलीस ठाण्यात थांबून होते. अखेर आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.