Virar Fish Market : तुम्हाला जर ताजे-ताजे-गरमगरम मासे खायला आवडत असतील तर विरारमधील व्हायरल व्हिडीओ तुमची झोप उडवेल. बोंबील ताजे दिसण्यासाठी त्यांना चक्क लाल रंग लावल्याचं उघड झाला आहे. अर्नाळा भागात हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत मासेविक्रेत्या महिला बोंबलांना चक्क लाल रंग लावताना दिसतायत. या लाल रंगामुळे मासळी ताजी दिसते आणि त्यांना चांगला भाव मिळतो.
झी मीडिया या व्हिडियोची पुष्टी करत नसली तरी शिळ्या आणि रंगवलेल्या माशांमुळे मानवी आरोग्यास मात्र धोका निर्माण होऊ शकतो.. त्यामुळे प्रशासनानं वेळीच दखल घेऊन या प्रकरणी कारवाई करण्याची गरज आहे.
मासे खवय्यांच्या आवडत्या पापलेटला आता जीआय मानांकन मिळणार आहे. मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानपरिषदेत ही घोषणा केली.. तव्यावरचं पापलेट फ्राय असो किंवा झणझणीत कालवण असू दे, पापलेट म्हटलं की अगदी तोंडाला पाणी सुटतं... पापलेट हा महाराष्ट्रातला सर्वाधिक निर्यात होणारा मासाही आहे.. मात्र महाराष्ट्रात पापलेटचं उत्पादन घटतंय. तेव्हा पापलेटच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने त्याला राज्य मासा हा दर्जा दिला होता.. आणि आता लवकरच त्याला जीआय मानांकनही मिळणार आहे. नव्या निर्णयामुळे पापलेट संवर्धनास मदत होण्याची आशा आहे.
महाराष्ट्रातल्या तमाम मत्स्यप्रेमींच्या ताटातून कोवळी पापलेट आणि कोळंबी आता गायब होणारेत. मासळीचा दुष्काळ लक्षात घेऊन मत्स्य विभागानं मोठं पाऊल उचललंय. बोंबील, पापलेट, कोळंबी, खेकडा यासह 54 प्रकारचे कोवळे मासे मारण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आलाय. गेल्या अनेक वर्षांमध्ये मत्स्य उत्पादनात सातत्याने घट होऊन मच्छीमारांना मत्स्य दुष्काळाचा सामना करावा लागतोय.
केंद्र सरकारनं 58 प्रजातींच्या माशांना संरक्षणासाठी राज्यांना शिफारस केली आहे. राज्य सरकारच्या मत्स्य विभागाने या शिफारशींतील 54 प्रजातींतील कोवळ्या माशांच्या मासेमारीवर निर्बंध घातले आहेत.त्यामुळे मत्स्यप्रेमींना आता महागडय़ा माशांचाच पर्याय उरणार आहे.