लाचखोर तहसीलदार मीनल दळवींच्या विक्रोळीच्या घरातून मोठी रोकड जप्त

लाचखोर तहसीलदार मीनल दळवी (Meenal Krishna Dalvi) यांनी करोडोंची माया जमवली आहे. याबाबत आता धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

Updated: Nov 12, 2022, 09:21 PM IST
लाचखोर तहसीलदार मीनल दळवींच्या विक्रोळीच्या घरातून मोठी रोकड जप्त title=

प्रफुल्ल पवार, रायगड : लाचखोर तहसीलदार मीनल दळवी (Meenal Krishna Dalvi) यांनी करोडोंची माया जमवली आहे. याबाबत आता धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मुंबईतील विक्रोळी कन्नमवार येथील घरात 1 कोटींची रोकड सापडली आहे. त्याआधी अलिबाग येथील राहत्या घरातून 60 तोळे सोने आणि 87 हजारांची रोकड जप्त करण्यात आली होती. अन्य ठिकाणच्या मालमत्तांची शोधमोहीम सुरू आहे. अशी माहिती नवी मुंबई एसीबीचे उपअधीक्षक ज्योती देशमुख यांनी दिली आहे.

शुक्रवारी 2 लाखांची लाच घेताना अलीबागच्या तहसीलदार मीनल दळवी आणि त्यांचा हस्तक राकेश चव्हाण यांना नवी मुंबई एसीबीने अटक केली होती. दोघानाही आज आलिबाग विशेष न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

वडीलोपार्जित आईकडून बक्षीसपात्र स्वरुपात मिळालेल्या जमिनीच्या सातबाऱ्यावर मुलाच्या नावाची नोंद करण्यासाठी तसेच याबाबत असलेल्या अपीलावर तक्रारदाराच्या बाजुने निकाल देण्यासाठी अलिबागच्या तहसीलदार (Alibag Tehsildar) मीनल दळवी  यांनी तक्रारदाराकडे 2 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तसेच लाचेची रक्कम एजंट राकेश चव्हाण याच्याकडे देण्यास सांगितले होते. त्यानुसार नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधिक्षक ज्योती देशमुख व पोलीस निरीक्षक शिवराज बेंद्रे यांच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी अलिबाग एसटी स्टँडजवळ सापळा लावून तहसीलदार मीनल दळवी यांच्यावतीने 2 लाख रुपयांची लाच स्विकारण्यासाठी आलेला एजंट राकेश चव्हाण याला रंगेहात पकडले होते.  

नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Navi Mumbai ACB Trap) सापळा रचून मीनल दळवी (Minal Dalvi) यांना ताब्यात घेतले. त्यानंतर उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्याची तक्रार केल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सकाळी मीनल दळवी यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर ऍन्टी करफ्शन ब्युरोच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर मीनल दळवी आणि एजंट राकेश चव्हाण या दोघांना शनिवारी दुपारी न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने या दोघांची दोन दिवसाच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.  

तहसीलदार मीनल दळवी यांना लाच घेतल्याप्रकरणी अटक केल्यानंतर नवी मुंबई एसीबीने त्यांच्याकडे असलेल्या बेहिशेबी मालमत्तेची तपासणी सुरु केली आहे, सोमवार पर्यंत या संपूर्ण मालमत्तेचा परिपूर्ण अहवाल येईल, अशी माहिती नवी मुंबई एसीबीच्या उपअधिक्षक ज्योती देशमुख यांनी दिली.