तब्बल 4 महिने दिली कोरोनाशी झुंज अखेर...मृत्यूला चकवण्याचा त्याचा संघर्ष....

कोरोनाची लागण झाल्यानंतर तब्बल 4 महिने जीवनमृत्यूशी झुंज दिली.

Updated: Aug 30, 2021, 02:54 PM IST
तब्बल 4 महिने दिली कोरोनाशी झुंज अखेर...मृत्यूला चकवण्याचा त्याचा संघर्ष....

मुंबई : बीडमधील एका व्यक्तीला तब्बल 120 दिवसांनंतर रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर तब्बल 4 महिने जीवनमृत्यूशी झुंज देऊन तो घरी परतलाय. बीड जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी तब्बल चार महिने प्रयत्नांची पराकाष्ठा करत योग्य त्या उपचारांनी त्याला मृत्यूच्या दाढेतून बाहेर आणलं आहे.

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील सारोळा गावचे श्रीहरी ढाकणे यांना 28 एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालय बीडमध्ये कोरोना संशयित रुग्ण म्हणून दाखल करण्यात आलं. त्यांना बीडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मुख्य म्हणजे त्याचं ऑक्सिजनचं प्रमाण 33 टक्के होतं तर एचआर सिटी स्कोर केवळ 25 इतका होता.

तात्काळ त्यांना रुग्णालयात बायप्याप मशीनवर ठेऊन उपचार सुरू करण्यात आलं. प्रत्येक मिनिटाला 45 लिटर इतका ऑक्सिजन पुरवठा चालू करण्यात आला. त्याचप्रमाणे इतर सर्व औषधं आणि उपचार चालू करण्यात आले. तब्बल 76 दिवस त्यांना बायपेप मशीनद्वारे ऑक्सिजन पुरवठा करण्यात आला.

यानंतर प्रकृती सुधारू लागली आणि तब्बल एकशे वीस दिवसांच्या डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांची प्रकृती आता बरी झाली आणि हॉस्पिटलमधून आता डिस्चार्ज देण्यात आलाय. 

श्रीहरी ढाकणे यांना तब्बल 120 दिवस कोरोनाशी संघर्ष करावा लागला. असं असलं तरी डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे श्रीहरी ढाकणे यांना जीवदान मिळालं कोरोना काळात बहुतेक रुग्ण हे कधी उपचाराअभावी तर कधी भीतीने दगावले मात्र आशा श्रीहरी ढाकणे यांना तब्बल 120 दिवस उपचारानंतर नवीन जीवन मिळालंय