कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा; टाटा एअरबसपाठोपाठ आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर

सत्तातरानंतर सलग पाचवा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला आहे

Updated: Oct 30, 2022, 10:25 AM IST
कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा; टाटा एअरबसपाठोपाठ आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर title=

वेदांता- फॉक्सकॉन (Vedanta-Foxconn), बल्क ड्रग्ज पार्क (Bulk Drug Park), मेडिसीन डिव्हाईस पार्क (Medical Device Park) आणि टाटा एअरबस (Tata Airbus Project) पाठोपाठ आता आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला आहे. विमान तसेच क्षेपणास्त्रांचे इंजिन बनवणारी फ्रेंन्च मल्टिनॅशनल कंपनी सॅफ्रन ग्रुप (Safran) मिहानमध्ये (Mihan Project) येण्यासाठी उत्सुक होती. तब्बल 10085 कोटी रुपयांचा हा प्रकल्प होता. एरोस्पेस आणि संरक्षणासंबधित उपकरणे तसेच त्यांची उपकरणी बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये सॅफ्रन कंपनी अव्वल होती. या कंपनीने भारतात येण्यासाठी काही कंपन्यांची यादी निश्चित केली होती. त्यात नागपूरमधील मिहानचाही समावेश होता. पण जागेशी संबधित प्रशासनाच्या दिरंगाईमुळे हा प्रकल्प हैद्राबादला गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महाराष्ट्र उद्योगात प्रगत राज्य असताना देखील एकापाठोपाठ एक उद्योग राज्यातून बाहेर जात आहेत. यामुळे राज्यातील बेरोजगारांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. सॅफ्रन ग्रुप  या रॉकेटचे इंजिन बनवणारा प्रकल्प हा महाराष्ट्रातील नागपूरमधील मिहानमध्ये येणार होता. त्यांनी यासाठी जागेची पाहणी देखील केली होती अशी माहिती समोर आली आहे. प्रशासकीय उदासिनतेमुळे हा प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

दरम्यान, गुजरातला मिळालेला टाटा-एअरबस या प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्याहस्ते आज भूमिपूजन होणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास बडोद्यात टाटा-एअरबस प्रकल्पाची पायाभरणी होईल. त्यामुळे गुजरातला लाखो रोजगार आणि हजारो कोटींची गुंतवणूक मिळणार आहे.