तुमच्या दुधात विष? भेसळखोरांनी केला कहर... नगर जिल्ह्यात धक्कादायक प्रकार उघडकीस

दुधाला सकस आहार म्हणून ओळखलं जातं. मात्र याच दुधात विष कालवून तुमचं आरोग्य बिघडवलं जातंय. आता तर नकली दूध बनवण्यासाठी सौंदर्य प्रसाधनात वापरल्या जाणाऱ्या लिक्विडचा वापर होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय

Updated: Mar 30, 2023, 09:57 PM IST
तुमच्या दुधात विष? भेसळखोरांनी केला कहर... नगर जिल्ह्यात धक्कादायक प्रकार उघडकीस

लैलेश बारगजे, झी मीडिया, अहमदनगर : सध्या जिकडे पहावं तिकडे दुधात भेसळ (Adulteration in Milk) पाहायला मिळतीय. कुठे दुधात पाणी मिसळलं जातंय तर कुठे डिटर्जंट पावडरचा (Detergent Powder) वापर होतोय, मात्र अहमदनगर जिल्ह्यात भेसळखोरांनी अक्षरश: कहर केलाय. इथं चक्क सौंदर्य प्रसाधनांमध्ये (Cosmetics) वापरल्या जाणाऱ्या लिक्विड पॅराफिनद्वारे (Liquid Paraffin) बनावट दूध (Fake Milk) तयार केलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. अन्न आणि औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) श्रीगोंदा तालुक्यात 12 ठिकाणी धाडी टाकून शेकडो लिटर बनावट दूध जप्त केलंय. 

या प्रकरणात 11 भेसळखोरांनी ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्याकडून नकली दूध बनवण्यासाठी वापरण्यात येणारं साहित्यही जप्त करण्यात आलंय.  श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी इथं 460 लिटर दूध आणि कृत्रिम दूध बनवण्यासाठी लागणारे साहित्य अन्न आणि औषध प्रशासनाने ताब्यात घेऊन नष्ट केलं आहे. श्रीगोंदा तालुक्यातील 12 ठिकाणी दहा टाकून अन्न आणि औषध प्रशासनाने दूध भेसळ करणाऱ्यांवर कारवाई केली आहे.

अमृतासारख्या दुधात विष?
लिक्विड पॅराफिन तसंच बेकरी प्रॉडक्टसाठी (Bakery Products) वापरण्यात येणाऱ्या व्हे पावडरद्वारे (Whey Powder) हे नकली दूध तयार केलं जातं. एक लिटर भेसळयुक्त दूध बनवण्यासाठी 8 ते 10 रूपयांचा खर्च येतो. या दुधाची बाजारात 40 रुपये लिटर दराने विक्री केली जाते. या बनावट दुधामुळे कॅन्सरसारखा (Cancer) भयानक आजार होऊ शकतो. तसच अपचन, पोटाचे विकार, लिव्हर आणि किडनीचे विकार होऊ शकतात.

'चहा नको ऊसाचा रस घ्या'
श्रीगोंद्यात सध्या कुणाकडे पाहुणे आले तर 'उसाचा रस घेता' असं विचारलं जातं. चहाचे कुणी नावही काढत नाही. कारण विचारले तर 'चहा पाजून आम्हाला तुमच्या आरोग्याशी खेळायचे नाही..' असं उत्तर इथली लोकं देतात.  दूध भेसळीचे मोठे रॅकेट सापडल्यापासून इथल्या लोकांनी दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा धसकाच घेतलाय. शहरातील एका स्वीट मार्ट चालकानेही आपल्याकडील मिठाईची विक्री निम्म्यावर आल्याचं सांगितलं. श्रीगोंद्यात चहाऐवजी उसाच्या रसाला मागणी वाढली आहे. ग्लासमध्ये मिळणारा रस आता लिटरमध्ये मिळू लागला आहे. त्यासाठी रिकाम्या बाटल्यांची व्यवस्था विक्रेत्यांनी केली आहे.

एकट्या श्रीगोंद्यात दररोज 1 लाख 60 हजार लिटर दुधाचे संकलन होत असे. आता ते अवघे 60 हजारांवर आलं आहे. तब्बल 1 लाख लिटर दुधाचं संकलन घटलं आहे. एफडीएने कारवाई केल्यानंतर त्याची माहिती पोलिसांना विलंबाने दिल्याने या प्रकरणातील मुख्य आरोपी पसार झाला आणि काही कागदपत्रे जाळून टाकली तसंच मोबाईल फेकून दिल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी मात्र हा आरोप फेटाळला आहे. 

अहमदनगर जिल्ह्यातील हे रॅकेट म्हणजे हिमनगाचं टोक आहे. भेसळखोरीतील अशा कितीतरी पुतना मावशी राजरोसपणे जनतेच्या आरोग्याशी खेळत आहेत.  त्यांचा शोध घेऊन त्यांना कायमची अद्दल घडवली जात नाही, तोवर भेसळखोरीच्या गोरखधंद्याला चाप बसणार नाही.