मुंबईः राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी ९ आमदारांसह भाजप-शिवसेनेच्या सरकारला पाठिंबा दिल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. अजित पवारांच्या बंडाने राष्ट्रवादीच्या (NCP Split) गोटात मोठी खळबळ उडाली आहे. अजित पवार यांनी 2 जुलै रोजी राजभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर, आता जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना विरोधीपक्ष नेता म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. अजित पवारांच्या बंडानंतर महाविकास आघाडीतही (MVA) मोठी अस्वस्थता पसरली आहे.
अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्यानंतर हा महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का समजला जातो. अजितदादांसोबत 40 आमदार असल्याचा दावा केला जातोय. जर हा दावा खरा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत 13 आमदार राहणार आहात. त्यामुळं विरोधी पक्षनेते पदावर आघाडीतील कोणत्या पक्षाचा दावा राहणार यावरुन चर्चा रंगली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी यावर प्रतिक्रिया देत विरोधीपक्ष नेता काँग्रेसचाच होईल, असं वक्तव्य केलं आहे.
अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीने आमदार जितेंद्र आव्हाड यांना विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती केली आहे. मात्र, काँग्रेसने यावर आक्षेप घेत ज्या पक्षाचे जास्त आमदार असतात त्याच पक्षाचा आमदार विरोधीपक्ष नेता होईल, असं म्हटलं आहे. तसंच, लवकरच काँग्रेसच्या सर्व नेत्यांची बैठक होईल आम्ही त्यावेळी सविस्तर चर्चा करु, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.
महाविकास आघाडी कायम राहिल. पवारसाहेबांसोबत अद्याप बोलणं झालं नाहीये. सध्या ते कराडला यशवंतराव चव्हाणांच्या समाधीच्या दर्शनासाठी गेलेत. महाविकास आघाडीच्या प्रचाराची सुरुवात होते. वज्रमुठ अधिक पक्की होणार आहे, असा विश्वासही बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.
विरोधीपक्ष नेते पदाबाबतही बाळासाहेब थोरातांनी स्पष्ट कलं आहे. राष्ट्रवादी पक्ष विरोधीपक्ष नेता ठरवू शकत नाही. ते गट नेता ठरवू शकतात. काँग्रेसकडे आमदारांची अधिक संख्या आहे त्यामुळं विरोधीपक्ष नेतापण आमच्याच पक्षाचा होईल, असं थोरातांनी स्पष्ट केलं आहे.
आमच्या पक्षाची लवकरच एक बैठक होणार आहे. त्यावेळी विधीमंडळ, विधानसभेचे सर्व आमदारांसोबत चर्चा करु. त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. पक्षांतर बंदी कायद्यासाठी विधानसभा अध्यक्षांनी काम करायला हवे, असंही थोरातांनी म्हटलं आहे.