Flight Rules: 2024 हे वर्ष संपायला आलंय. त्यामुळे प्रत्येकानेच शहरापासून दूर कुठेतरी जाण्याचा प्लान नक्की केला असेल. दुसऱ्या देशात जाणे किंवा स्वतःच्या देशात कुठेतरी प्रवास करण्यासाठी लोकं फ्लाइटने जाणे पसंत करतात. कारण इतर पद्धतींच्या तुलनेत तुम्ही फ्लाइटद्वारे कमी वेळेत तुम्हाला हव्या त्या ठिकाणी पोहोचू शकता. विमान प्रवासाचे खास नियम असतात. या प्रवासादरम्यान सामानाचे वजन मर्यादेपेक्षा जास्त नसावे, कारण वजन जास्त असेल तर शुल्क भरावे लागते. पण विमान प्रवास करताना तुम्ही किती पैसे सोबत घेऊन जाऊ शकता? किती पैसे ठेवण्याची मर्यादा असते? जाणून घेऊया.
भारतात आणि परदेशात पैसे काढण्याची सुविधा सहज उपलब्ध असते. पण बरेच लोक आपल्या सोयीसाठी अधिक रोख रक्कम सोबत बाळगतात. अशा लोकांना विशेषत: जर तुम्ही फ्लाइटने प्रवास करत असाल आणि तुमच्यासोबत तुम्हाला रोख रक्कमदेखील न्यायची आहे तर यासाठी नियम आहे. तुम्ही तुमच्या बॅगेत फक्त मर्यादित रोकड घेऊन जाऊ शकता. विमान प्रवासात आपल्याजवळ किती रक्कम असणे नियमात बसते? हे माहिती असायला हवे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार जर तुम्ही देशांतर्गत विमानाने प्रवास करत असाल तर तुम्ही जास्तीत जास्त 2 लाख रुपयांपर्यंच रोख रक्कम घेऊन जाऊ शकता. यापेक्षा जास्त रोख रक्कम तुम्हाला नेता येत नाही. पण जर तुम्ही विमानाने परदेशात जात असाल तर हा नियम लागू होत नाही.
जर तुम्ही नेपाळ आणि भूतान सोडून इतर कोणत्याही देशाला विमानाने भेट देणार असाल तर तुम्ही 3000 डॉलर्सपर्यंतचे विदेशी चलन सोबत घेऊ शकता. परंतु जर तुम्हाला यापेक्षा जास्त रोकड घेऊन जायचे असेल तर तुम्हाला स्टोअर व्हॅल्यू आणि ट्रॅव्हल चेकची आवश्यकता असते.
ज्याप्रमाणे तुम्ही फ्लाइटमध्ये एका मर्यादेपर्यंत रोख रक्कम घेऊन जाऊ शकता त्याचप्रमाणे फ्लाइटमधील सामानाच्या वजनाबाबतही नियम आहे. तुम्ही तुमच्या हँडबॅगमध्ये 7 ते 14 किलो वजन ठेवू शकता. बोर्डिंग पास घेताना तुम्ही काउंटरवर दिलेल्या चेक-इन बॅगेजचे वजन 20 ते 30 किलो असू शकते. हाच नियम आंतरराष्ट्रीय उड्डाणांनाही लागू होतो. तुम्हाला तुमच्या फ्लाइटच्या अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भातील सविस्तर माहिती मिळू शकते.
फ्लाइटने प्रवास करताना तुम्ही काही वस्तू सोबत ठेवू शकत नाही. विमान प्रवासादरम्यान काही वस्तू घेऊन जाण्यास मनाई असते. यामध्ये क्लोरीन, आम्ल, ब्लीच यासारख्या रसायनांचा समावेश असतो.
विमान प्रवासात अल्कोहोल घेऊन जाऊ शकतो का? असा प्रश्न अनेकजण विचारतात. तुम्हालाही या प्रश्नाचे उत्तर माहिती असायला हवे. तुम्ही तुमच्या चेक-इन बॅगमध्ये अल्कोहोल ठेवू शकता. परंतु त्याचे प्रमाण 5 लिटरपेक्षा जास्त नसावे.