close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

संपत्तीच्या वादातून मुलीनंच केली पित्याची निर्घृण हत्या

बाबुराव कंकाल असं मृत्युमुखी पडलेल्या पित्याचं नाव आहे

Updated: Oct 12, 2019, 10:31 AM IST
संपत्तीच्या वादातून मुलीनंच केली पित्याची निर्घृण हत्या

जयेश जगड, झी २४ तास, अकोला : अकोल्याच्या खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. संपत्तीच्या वादातून एका मुलीनंच आपल्या जन्मदात्या पित्याचा खून केल्याचं समोर आलंय. या घटनेनं परिसरात अनेकांना धक्का बसलाय.  

खदान पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या प्रादेशिक कार्यशाळेच्या मागच्या भागात ही घटना घडलीय. बाबुराव कंकाल असं मृत्युमुखी पडलेल्या पित्याचं नाव आहे. त्यांची मुलगी रेश्मा बाविस्कर हिनंच त्यांच्यावर धारदार चाकूनं हल्ला केला. रेश्मा ही विवाहीत असल्याचं समजतंय. 

हाती आलेल्या माहितीनुसार, बाबुराव कंकाल यांचा आणि मुलगी रेश्मा यांचा संपत्तीवरून वाद झाला. या वादानंतर संतापलेल्या रेश्मानं आपल्या जन्मदात्यावर चाकू हल्ला केला. या घटनेत बाबुराव गंभीर जखमी झाले. 

स्थानिक नागरिकांनी बाबुराव यांना जवळच असलेल्या सर्वोचार रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी मात्र त्यांना मृत घोषित केलं. 

पोलिसांनी या घटनेत रेश्मा बाविस्कर हिच्यावर गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे. पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे. मात्र, या घटनेमुळे सख्ख्या नात्यांवरही प्रश्नचिन्ह उभं केलंय.