जयेश जगड,अकोला - काही दिवसांपूर्वी अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या विशेष पथकाने गुटख्यावर जप्तीची कारवाई केली आहे. या कारवाई दरम्यान सुमारे 40 लाखांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला. मात्र पोलिसांनीच केलेल्या कारवाईमुळे पोलिस अडचणीत सापडले आहेत. अकोल्यातील अकोला बिजनेस सेंटर मध्ये गुटखा अवैधरित्या विक्री येत असल्याची माहिती विशेष पथकाला मिळाली आणि माहितीच्या आधारे धाड टाकून पोलिसांनी गुटखा जप्त केला होता.
महाराष्ट्र सरकारने 2012 मध्ये सुगंधी गुटख्यावर बंदी आणली होती मात्र दहा वर्ष उलटूनही हा प्रतिबंधित गुटखा चोरीच्या मार्गाने महाराष्ट्रात आणला जातो.आणि किराणा दुकान,पानटपरीवर दुप्पट भावाने विकला जातो. महाराष्ट्राला लागून असलेल्या राजस्थान, गुजरात आणि मध्यप्रदेश या राज्यातून अवैध तस्करी होते.
अकोल्यात कोट्यवधींचा गुटखा आजपर्यंत पकडला गेला मात्र यातील मुख्य सूत्रधार हाती लागला नाही. कोट्यवधींचा गुटखा आजपर्यंत पोलीस विभागानेच पकडला आहे. अन्न आणि औषध प्रशासनाची अंतर्गत ही कारवाई होणे अपेक्षित आहे मात्र अपुरा मनुष्यबळ आणि सुरक्षेची कारणे देत अन्न आणि औषध प्रशासन विभाग पळवाटा काढताना पाह्यला मिळते.राज्याचे अन्न आणि औषध विभाग मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी खुद्द अकोल्यातील पानटपरीवर कारवाई करावी लागली होती. तर अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी खुद्द वेशभूषा बदलून जिल्ह्यातील गुटखा माफियांचा स्टिंग ऑपरेशन केले होते.
का पकडले जात नाही गुटखा माफिया ?
असा प्रश्न जिल्ह्यात नेहमी उपस्थित केला जातो. गुटखा माफिया हे स्वतःच्या नावावर कधीही जागा भाड्याने घेत नाही. त्यामुळे पकडलेला माल कुणाचा या प्रश्नाचो उत्तर नेहमी अनुउत्तरीत राहते. आता पोलीसांनी अकोल्यात जप्त केलेल्या 40 लाखांच्या गुटखा प्रकरणी आरोपी फरार आहे.
पण या गुटखा जप्तीच्या कारवाईत कसूर केला अशा ठपका ठेवत अकोल्याचे पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी कर्तव्यात कसूर करणाऱ्या जुने शहर पोलीस ठाण्यातील 6 कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. तर ठाणेदार, विशेष पथकाचे प्रमुख आणि स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप केला आहे. तर दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना सुद्धा कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. याचा सदर अहवाल पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे लवकरच पाठवण्यात येणार आहे. यामुळे आता अकोल्यात ''करे कोई भरे कोई''... अश्या आशयाची एकच चर्चा सुरू आहे.