कोकणात साकारणार सर्वात सुंदर रस्ता; प्रवासाचा अविस्मरणीय अनुभव देऊ पाहणाऱ्या 'या' प्रकल्पाचं काम कुठवर पोहोचलं?

Coastal Highway : राज्यात तयार होतोय एक कमाल रस्ता. कसं सुरुय काम, कुठवर आली संपूर्ण प्रक्रिया? पाहा सविस्तर बातमी आणि या रस्त्यासंदर्भातील नवे Updates  

सायली पाटील | Updated: May 22, 2024, 09:36 AM IST
कोकणात साकारणार सर्वात सुंदर रस्ता; प्रवासाचा अविस्मरणीय अनुभव देऊ पाहणाऱ्या 'या' प्रकल्पाचं काम कुठवर पोहोचलं?  title=
Alibaug Revas To Reddy Coastal Route Two Gulf Bridge work latest updates

Coastal Highway : महाराष्ट्राला लाभलेल्या तब्बल 720 किमी अंतराच्या सागरी किनाऱ्याला लागून असणाऱ्या बहुतांश भागातून आता अगदी सहत प्रवास करणं शक्य होणार आहे. निमित्त ठरताहेत ते म्हणजे राज्यात सक्रिय असणारे अनेक प्रकल्प. सध्याच्या घडीला राज्याच्या सागरी किनारा मार्ग प्रकल्पाकडे सर्वांच्या नजरा असून, हा प्रकल्प कोकणकरांसाठी बराच फायद्याचा ठरणार असंच चित्र पाहायला मिळत आहे. एकिकडे मुंबई- गोवा महामार्गानं कोकणवासियांनी निराशा केलेली असतानाच आता सागरी किनारा मार्ग प्रकल्पाकडून अनेकांच्या असंख्य अपेक्षा असल्याचं पाहायला मिळत आहे.  

काम कोणत्या टप्प्यात? 

मुंबई ते सिंधुदुर्ग हा प्रवास अधिक वेगवान, सुकर करण्यासाठी म्हणून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं (MSRDC) अलिबागमधील रेवस ते रेड्डी ‘सागरी किनारा मार्ग’ प्रकल्प हाती घेतला आहे. सध्या या प्रकल्पाचं काम निविदा स्तरावर असून, MSRDC नं रेवस ते कारंजा आणि आगरदांडा ते दीघी अशा दोन महत्त्वाच्या खाडीपुलांसाठी निविदा मागवल्या होत्या. उपलब्ध माहितीनुसार सध्या या निविदा (Tender) प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत पाच निविदा सादर करण्यात आल्या आहे. सध्या सादर झालेल्या निविदा तांत्रिक असून, येत्या काळात आर्थिक निविदाही सादर होणार आहेत. 

हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : कुठवर पोहोचला मान्सून? मुंबईत ढगाळ वातावरण, राज्यासाठी काय आहे हवामान विभागाचा इशारा? 

अशोका बिल्डकॉन, विजय एम मिस्री कन्स्ट्रक्शन आणि टी अँड टी या कंपन्यांनी आगरदांडा ते दीघी खाडीपुलासाठी निविदा दिल्या आहेत. यामागोमाग सादर होणाऱ्या आर्थिक निविदांनंतर त्यांच्यावर शिक्कामोर्तब होण्याचा टप्पाही लवकरच पार पडणार आहे. निविदा स्तरावरील कामांची पूर्तता झाल्यानंतर या दोन्ही खाडीपुलाच्या कामांची सुरुवात करण्यात येणार आहे. 

कसा आहे हा प्रकल्प? 

कोकण आणि समुद्र हे घनिष्ठ नातं. याच कोकणातील सागरी किनारपट्टीला लागून निसर्गाची किमया पाहत प्रवासाचा अनुभव या प्रकल्पामुळं इथून पुढे जाणाऱ्या प्रत्येकाला मिळणार आहे. MSRDC नं या प्रकल्पाअंतर्गत रेवस ते रेड्डी असा 447 किमी अंतराचा सागरी किनारा मार्ग उभारण्याचा निर्णय घेतला आहे. आठ खाडीपूल असणारा हा मार्ग मुंबई आणि कोकणाला जोडणार असून, त्यामुळं राज्यातील प्रवास अधिक सुकर तर होईलच पण कोकणवासियांना मोठा दिलासाही मिळेल हे नक्की.