close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

कौमार्य चाचणीला विरोध केला म्हणून समाजाची अंत्ययात्रकडेही पाठ

 विवेक यांच्या आजीच्या अंत्ययात्रेमध्ये सहभागी होण्यास गावातील लोकांना मज्जाव केला.  

Updated: May 16, 2019, 02:01 PM IST
कौमार्य चाचणीला विरोध केला म्हणून समाजाची अंत्ययात्रकडेही पाठ

चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, अंबरनाथ : कौमार्य चाचणीला विरोध केला म्हणून कंजारभाट समाजाच्या जातपंचातीने एका कुटुंबावर बहिष्कार टाकल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. अंबरनाथमध्ये हा प्रकार घडला असून विवेक तमायचीकर असे या पीडिताचे नाव आहे. विवेक यांच्या आजीच्या अंत्ययात्रेमध्ये सहभागी होण्यास गावातील लोकांना मज्जाव केला.  

विवेक तमायचीकर यांनी कौमार्य चाचणीला विरोध केला होता म्ह्णून  कंजारभाट समाजाच्या जातपंचातीने दीड वर्षापासून त्यांना बहिष्कृत केले आहे. तमायचीकर यांच्या घरातील कोणत्याही कार्यक्रमात समाज सहभागी होत नाही. किंवा समाजाच्या कोणत्याही कार्यक्रमात त्यांना सहभागी करुन घेतले जात नव्हते. अंत्ययात्रेळी आपापसातले मतभेद विसारायला हवे असे म्हणतात. पण यावेळेसही समाजाने हद्द पार केली. विवेक तमायचीकर यांच्या आजीचे काल रात्री १०.०० वाजता देहावसान झाले. या दुःखाच्या कार्यक्रमात कंजारभाट समाजातील लोकांनी सहभागी होणे अपेक्षित होते. मात्र तमायचीकर यांच्या आजीच्या अंत्ययात्रेला समाजातील एकही माणूस सहभागी झाला नाही. 

जात पंचायतीने  तमायचीकर यांच्या आजीच्या अंत्ययात्रेमध्ये सहभागी होण्यास गावातील लोकांना मज्जाव केल्याचे उघड झाले आहे. तसेच संवेदना शून्य प्रकार म्हणजे ज्यावेळी तमायचीकर यांच्या आजीचे निधन झाले त्याचवेळी याच समाजातील एक लग्नातील हळदी समारंभ सुरू होता. या समारंभात वाजणाऱ्या डीजेवर समाज बांधवांनी ठेका धरला पण कोणी अंत्ययात्रेस येण्यास स्वारस्य दाखवले नाही. समाजातील म्होरक्याने भाषण करत नागरिकांना अंत्ययात्रेस जाण्यास मज्जाव केल्याचे समोर आले आहे.

'आपण समाजाच्या अनिष्ट परंपरेला विरोध करत आहोत म्हणून समाजाने माझ्यावर हा बहिष्कार टाकला आहे. मात्र आपण यासंदर्भात पोलिसांत तक्रार करणार असल्याचे' विवेक तमायचीकर यांनी सांगितले. शासनाने याची गंभीर घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. एकीकडे पुरागोमी महाराष्ट्राचा डंका पिटला जात असताना अशा घटनांमुळे अजूनही समाजाची मानसिकता बदलण्यास तयार नाही हेच निष्पन्न होत आहे.