मयूर निकम, झी मीडिया
Buldhana: बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील बारलिंगा गावामध्ये अमरावती जिल्ह्यातील एका डॉक्टर तरुणीला जबर मारहाण आणि अश्लील शिवीगाळ करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपींनी या डॉक्टर तरुणीचा विनयभंग केल्याचंही तिने तक्रारीत म्हटलं आहे. पीडित तरुणीने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर तीन आरोपींविरोधात विनयभंगाची आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीचे सिंदखेड राजा तालुक्यातील बारलिंगा येथील एका तरुणाशी डॉक्टरचे प्रेमसंबंध आहेत. मात्र प्रियकर फोन उचलत नसल्याने थेट तरुणीने प्रियकराच्या घरी येऊन घरच्यांना त्याबद्दल विचारले. मात्र प्रियकराच्या घरच्या लोकांनी तिलाच अश्लील शिवीगाळ करत जबर मारहाण केली आहे. मारहाण करणाऱ्यांमध्ये एक महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
याप्रकरणी आरोपी गणेश जायभाये, लता जायभये, बद्रिनाथ जायभाये यांचा समावेश असून त्यांच्यावर मारहाण आणि विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.
मारहाण करण्यात आलेली तरुणीही अमरावती जिल्ह्यात वैद्यकीय अधिकारी आहे. ती बुलढाणा जिल्ह्यातील बारलिंगा या गावात गुरुवारी संध्याकाळी गेली होती. तिथे ती एका घरात गेल्यानंतर तिला घरातील दोन पुरूष आणि महिलेने मारहाण करण्यास सुरुवात केली. काहींनी तिचा विनयभंगदेखील केला. गावातील काही नागरिकांनी ही घटना पाहताच तिची सुटका केली आणि घाबरलेल्या तरुणीला पोलीस स्टेशनला पोहोचवले.
नालासोपाऱ्यातही पोलीस भरतीचे प्रशिक्षण देणाऱ्या पोलिसानेच तरुणीवर अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. समाधान गावडे असं आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. समाधान गावडे हा त्याची मैत्रिण अनुजा शिंगाडे हिच्यासोबच पोलीस प्रशिक्षण केंद्र चालवत होता. हे दोघेही वसई लोहमार्ग पोलिसांत कार्यरत होते. दोघे मिळून नालासोपारा येथे विजयी भव नावाचे पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र चालवीत होते. या पोलीस केंद्रात दाखल होणाऱ्या तरुणींना वारंवार फोन करणे त्यावर तरुणींना अश्लील मेसेज करणे, त्यांचा पाठलाग करणे, अश्लील व्हिडीओ कॉल करत होता. त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करायचा. विरोध केल्यानंतरही त्याचे कृत्य तसेच होते. त्यामुळं घाबरुन अनेक तरुणींनी पोलीस प्रशिक्षण केंद्रात जाणे सोडून दिले होते. दोन तरुणींनी या तरुणाविरोधात तक्रार दाखल केली आहे.