प्रसिद्ध निवेदिकेसोबत हायवेवर जीवघेणा प्रसंग! सोलापूर-उमरगा रोडवर नेमकं काय घडलं?

Anchor Shweta Hulle Post: सोलापुर येथील प्रसिद्ध निवेदका श्वेता हुल्लेवर जीवघेणा प्रसंग ओढावला होता. तिथे फेसबुक पोस्ट करत इतर प्रवाशांना सावधान केलं आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jan 17, 2024, 12:11 PM IST
प्रसिद्ध निवेदिकेसोबत हायवेवर जीवघेणा प्रसंग! सोलापूर-उमरगा रोडवर नेमकं काय घडलं? title=
Anchor Shweta Hulle And Her Family Attacked By goons on Solapur Umarga Highway daylight

Anchor Shweta Hulle Post: सोलापुर येथील प्रसिद्ध निवेदका श्वेता हुल्ले यांच्यावर मोठा कठिण प्रसंग बेतला होता. श्वेता या सोलापूर-उमरगा महामार्गावर प्रवास करत असताना चोरट्यांनी त्यांची कार अडवून हल्ला केला. मात्र, केवळ दैव बलवत्तर म्हणून कुटुंबीयांना जीवावर बेतले नाही, असं श्वेता यांनी म्हटलं आहे. श्वेता हुल्ले यांनी फेसबुक पोस्ट करत याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. 

सोलापुर शहरापासून अगदी काही अंतरावर असलेल्या इटकळ गावाजवळ घडली आहे. तेव्हा श्वेता या त्यांच्या कुटुंबासोबत प्रवास करत होत्या. त्याचवेळी काही दरोडेखोरांनी त्यांची कार अडवून त्यांच्यावर हल्ला केला. सोलापूर-धाराशिव जिल्ह्याच्या सीमेवर ही घटना घडली आहे. मात्र, पोलिसांकडून याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. 

श्वेता यांनी फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटलंय?

साधारण ८-१० दिवसांपूर्वीची घटना आहे. माझी आई, भाऊ, त्याची लहान साडेतीन वर्षाची मुलगी आणि भावाचे २ मित्र अणदूर जवळील चिवरी महालक्ष्मीच्या मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन करून सोलापूरकडे येत असताना, साधारणतः भर दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ईटकळ गावाच्या पुढे सोलापूरच्या दिशेने १ किलोमीटर अंतराच्या हायवेवर गाडी पुढे गेली असताना, एक उंच, काळाकुट्ट, भयंकर दिसणारा माणूस रस्त्याच्या मधोमध हातामध्ये भला मोठा जाड रॉड घेऊन आमच्या गाडीच्या अगदी समोर गाडी अडवत येऊन उभा राहिला. गाडी भाऊ अनिल ड्राईव्ह करत होता. त्याला पाहिल्यानंतर भावाला प्रचंड भीती वाटली. त्याला लक्षात आले की हा माणूस आता आपल्याला अडवून लूटमार करणार. तो गाडी तसाच चालवत पुढे निघाला होता. पण नवीन वाहन असल्याने त्यात असलेल्या नवीन फीचरमुळे ती व्यक्ती समोर आल्यामुळे अचानक जोरात ब्रेक लागून गाडी जागेवर थांबली. गाडीचा स्पीड खूप जास्त होता. तेवढ्याच जास्त स्पिड मध्ये गाडी जागेवर थांबली. त्यामुळे गाडीत बसलेल्या बाळाला, आईला वगैरे थोडा मार लागला. लागलीच तो दरोडेखोर समोरच्या बोनेटवर काच फोडण्यासाठी म्हणून चढला आणि त्याने आजूबाजूला शेतात लपलेल्या त्याच्या साथीदारांना आवाज देऊन बोलवले.

लगेच शेतामध्ये लपलेले ६-७ दरोडेखोर हातामध्ये चाकू, कुऱ्हाड, तलवारी आणि रॉडसारखी भयानक शस्त्र घेऊन गाडीवर हल्ला चढवू लागले. मोठा दगड घेऊन मागच्या सीटवर माझी आई बसली होती. तिथे तिच्या साईडला काचेवरती त्यांनी टाकला. पण काच फुटली नाही. त्यामुळे ते आणखी जास्तच चवताळले. त्या रोडवर पुढे आणि पाठीमागे साधारण १ किलोमीटरपर्यंत तरी कुठलीच गाडी किंवा कोणतेच वाहन तिथे नव्हते. मात्र आम्ही सोलापूरच्या दिशेकडे निघालेलो होतो. पलीकडे उमरग्याच्या दिशेला जाणारे एक ट्रक ही असाच दरोडा टाकून त्यांनी उभा केला होता. त्यांना सुद्धा प्रचंड मारहाण सुरू होती. आमच्या गाडीच्या समोर उभा असणारा माणूस काचा उघडा, गाडीचा दरवाजा उघडा म्हणून जोरजोरात धमकाऊ लागला. आजूबाजूने हल्लेखोर चाकू, कोयता, कुऱ्हाडी आणि काठ्या घेऊन गाडीच्या काचा फोडण्याचा प्रयत्न करतच होते. गाडीत बसलेले सगळेच प्रचंड घाबरले होते. तेवढ्यात एकाने पाठीमागे जाऊन मागची काच फोडली. त्याच क्षणी समोर असलेला दरोडेखोर आणि इतर सगळेच पाठीमागून गाडीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी माझ्या भावाने समोरून दरोडेखोर सरकल्यामुळे गाडी स्पीडमध्ये पुढे नेली आणि फास्ट पळवत सोलापूरच्या दिशेला आणली आणि कसेबसे सर्वांचे प्राण वाचवले. या भयानक घटनेमुळे आम्ही सगळेच पूर्ण हादरून गेलो आहोत.

तिथून कसा तरी जीव वाचवत माझा भाऊ आणि गाडीतले इतर सगळे थोडेसे पुढे आले. आणि पुढे येऊन त्यांनी ११२ नंबरवर संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. त्यावेळी तिथून अजब उत्तर मिळाले. त्यांनी सांगितले की तिथेच थांबा, आम्ही येत आहोत. त्यांचे उत्तर ऐकून आम्हाला हसावे की रडावे तेच कळत नाहीये. तिथेच थांबा म्हणजे त्या दरोडेखोरांकडून जीव गमावून घ्या, मार खावा, तोपर्यंत आम्ही सगळे झाल्यावर येतोच तिथे, असा अजिबात होत नाही बरं. या घटनेनंतर तिथून निघून थेट सोलापूर शहरामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोरच गाडी उभी केली. स्वतःचा जीव एवढ्या भयानक परिस्थितीतून वाचवून आल्यावर कळत नव्हते नेमके काय करावे. यासाठी थोडा वेळ गाडी बाजूला लावली आणि पाणी पिऊन थांबले. तेवढ्यात एक ट्रॅफिक पोलिस तिथे आले, त्यांना माझ्या भावाने सगळी हकीकत सांगितली. विचारले की तुम्ही कोण यावर कारवाई का करत नाही? त्यांनी उत्तर दिले कि आम्ही तिथेच राहतो. त्यामुळे आमचा जीव धोक्यात येईल आम्ही काही बोलू शकत नाही. तुम्ही बोला, तुम्ही आवाज उठवा

आपण जर सोलापूर-उमरगा किंवा उमरगा-सोलापूर प्रवास करत असाल तर सावध राहा. या रोडवर दिवसाढवळ्या गाड्या अडवून दरोडेखोर लोकांना लुटत आहेत. तुमचा जीव ही घ्यायला हे लोक पुढे मागे पाहत नाहीत. निव्वळ दैव बलवत्तर म्हणून आमच्या घरचे सुखरूप आहेत. भयानक घटनेने आम्ही हादरून गेलो आहोत. या हायवेवर प्रवास करणार्‍यांना सावध करावे म्हणून ही पोस्ट केली आहे.