अहमदनगर: लोकपालच्या मुद्द्यावरून झालेल्या आंदोलनामुळेच भाजपला सत्ता मिळाली. मात्र, आज तेच सरकार जनतेशी गद्दारी करत आहे. लोकपाल कायद्याच्या अंमलबजावणीचे आश्वासन देणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर माझ्या मनातून उतरलेत, अशी खंत सोमवारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बोलून दाखविली. लोकपाल कायद्याच्या अंमलबजावणीसाठी अण्णांनी राळेगणसिद्धी येथे सुरू केलेल्या आंदोलनाचा आज सहावा दिवस आहे. मात्र, अद्यापही सरकारकडून ठोस काहीही आश्वासन देण्यात आलेले नाही.
यापूर्वीही अण्णा हजारे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लोकपालच्या मुद्द्यावरून लक्ष्य केले होते. लोकपाल कायदा झाल्यानंतर एका वर्षांच्या आत राज्यात लोकायुक्त कायदा होणे गरजेचे असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काहीही कार्यवाही केली नाही. राज्याला देवेंद्र फडणवीस हे चांगले मुख्यमंत्री मिळाले, असे कौतुक आपण करीत होतो. पण साडेचार वर्षानंतर मुख्यमंत्र्यांची अवस्था 'ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या, वाण नाही पण गुण लागला', अशी टीका अण्णा हजारे यांनी केली होती.
अण्णा उपोषणावर ठाम, पद्मभूषणही परत करण्याचा इशारा
तर दुसरीकडे सरकारने अण्णांच्या ९० टक्के मागण्या मान्य केल्याचे वृत्त आहे. परंतु, अण्णा हजारे यांनी यावर आपला विश्वास नसल्याचे सांगितले. माझ्या नव्वद टक्के मागण्या मान्य झाल्या असत्या तर मी कशाला उपोषणाला बसलो असतो? शब्द न पाळण्याच्या बाबतीत काँग्रेसनं डॉक्टरेट केलीय, तर भाजप ग्रॅज्युएट आहे. केंद्रातले मंत्री आणि मुख्यमंत्री मला भेटायला येणार असे मला कळवण्यात आले. मात्र, मी त्यांना सांगितले की, तुम्ही आलात की लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. तुम्ही ठोस निर्णय घ्या, त्यानंतर मागण्या मान्य झाल्याचे लेखी आश्वासन द्या. त्यानंतरच मी विचार करेन, असेही अण्णा हजारे यांनी सांगितले.