ओएलएक्सवरून खरेदी करताय? सावधान...

तुमच्या व्हॉट्सअप नंबरवर डिलीव्हरीचे अपडेटही पाठवले जातात पण.... 

Updated: Aug 17, 2019, 08:33 PM IST
ओएलएक्सवरून खरेदी करताय? सावधान... title=

विशाल करोळे, झी २४ तास, औरंगाबाद : ओएलएक्सवर एखादी गाडी, दुचाकी किंवा वस्तू खरेदी करत असाल, तर सावधान... सैन्यातील अधिकारी असल्याचं सांगत ओएलएक्सवरून डॉक्टर, इंजिनिअर्सनाच नव्हे, तर पोलीस अधिकाऱ्यांनादेखील गंडा घालण्याच्या घटना घडल्यात. औरंगाबादमध्ये ओएलएक्स या ई-कॉमर्स साइटवरून दुचाकी, चार चाकी आणि मोबाईल खरेदीत फसवणूक होण्याचं प्रमाण वाढलंय. गेल्या दोन महिन्यांत थोड्याथोडक्या नव्हे, तर अशा प्रकारच्या तब्बल ७० तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यामुळं या प्रकरणांच्या तपासासाठी औरंगाबाद पोलिसांनी स्वतंत्र विभागच निर्माण केलाय.

ओएलएक्स वेबसाईटवर चार चाकी गाड्या, बुलेट्स, दुचाकी मोटारसायकली, मोबाईल फोन कमी किंमतीत विक्रीला उपलब्ध असल्याची जाहिरात आधी टाकली जाते. आपण लष्करी अधिकारी आहोत. आपले आर्मी अकाऊंट असल्यानं नुसत्या फोन नंबरऐवजी तुम्ही गुगल पेचा क्यूआर कोड स्कॅन करून पाठवा, असं सांगितलं जातं.

त्यानंतर तुमच्या व्हॉट्सअप नंबरवर डिलीव्हरीचे अपडेटही पाठवले जातात. गाडी पॅकिंग करतानाचे, गाडी ट्रान्सपोर्ट होत असल्याचे फोटोही पाठवले जातात. प्रत्येक वेळी पैशांची मागणी केली जाते... मात्र मागवलेली वस्तू काही हाती मिळत नाही.
बाजारात ज्या किंमतीत गाडी येते, त्यापेक्षा अधिक पैसेदेखील तुमच्याकडून उकळलेले जातात.

सैन्य दलातील अधिकारी असल्याची बतावणी केल्यानं अनेक जण त्यावर विश्वास ठेवतात आणि त्यांची फसगत होते.
राजस्थानच्या भरतपूर भागातून हे फसवणुकीचं रॅकेट चालवलं जातंय, अशी माहिती सायबर सेलचे पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांनी दिलीय. 

अनेक डॉक्टर्स, शिक्षक... एवढंच नव्हे तर काही पोलिसांचीही अशाप्रकारे फसवणूक झालीय. त्यामुळं ई कॉमर्स साइटवरून खरेदी करताना सावधगिरी बाळगा, असं आवाहन पोलिसांनी केलंय.

केवळ ओएलएक्स नव्हे, तर आता फेसबुकच्या मार्केट प्लेसवरुनही अशी फसवणूक सुरू झालीय. तेव्हा ग्राहकांनी ऑनलाइन खरेदी करताना अधिक काळजी घेण्याची गरज आहे.