मुंबई : राज ठाकरे यांच्या इशाऱ्य़ानंतर पोलिसांकडून कारवाईला सुरुवात झाली आहे. ठाण्यात भोंगे आणि धार्मिक वातावरण पाहता ठाणे जिल्ह्यात १४४ कलम जमावबंदी लागू करण्यात आला आहे. ठाणे पोलीस आयुक्तालय मार्फत हा कलम लागू करण्यात आला असून जातीय दंगल घडू नये यासाठी पोलीस प्रशासन देखील सज्ज झाले आहे.
दुसरीकडे नवी मुंबईत मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झाली आहे. मनसे नवी मुंबई उपशहर अध्यक्ष प्रसाद घोरपडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
उल्हासनगरात मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झाली आहे. मनसे जिल्हाध्यक्ष सचिन कदम, उपजिल्हाध्यक्ष प्रदीप गोडसे, शहर अध्यक्ष बंडू देशमुख यांना विठ्ठलवाडी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
राज्यभरात मनसेच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना पोलिसांकडून नोटीस दिल्या जात आहेत. राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका जाहीर केल्याने 4 मे रोजी राज्यात तणाव वाढण्याची शक्यता आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या भोंग्यांविरोधात चालिसा लावण्यावर ठाम आहेत. त्याबाबत त्यांनी पत्रक काढलं असून ज्याठिकाणी अजानचे भोंगे सुरू असतील त्याठिकाणी हनुमान चालिसाचे भोंगे लावण्याच्या आदेश त्यांनी या पत्रकातून मनसे कार्यकर्त्यांना दिले आहेत. सरकारनं बोटचेपी भूमिका घेतल्यामुळे ही भूमिका घेतल्याचंही त्यांनी या पत्रकात नमूद केलंय. राज ठाकरेंनी या पत्रकात पुन्हा एकदा शरद पवारांवरही हल्लाबोल केलाय.
राज्यातली कायदा सुव्यवस्था बिघडल्यास कारवाई करणार असल्याचा सज्जड इशारा पोलीस महासंचालकांनी दिलाय. कुणीही कायदा हातात न घेण्याचं आवाहनही डीजी रजनीश शेठ यांनी केलंय.