धक्कादायक! पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या हत्येमध्ये ठाकरे गटाच्या आमदाराचा सहभाग?

Shashikant Warise Death :  पत्रकार शशिकांत वारिसे यांनी सोमवारी सकाळी एका ग्रुपमध्ये एक बातमी टाकली होती. त्यानंतर संशयित आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याने थार गाडीने वारिसे यांना थार गाडीखाली चिरडले. उपचारादरम्यान शशिकांत वारिसे यांचा मंगळवारी दुर्दैवी मृत्यू झाला होता

Updated: Feb 11, 2023, 12:44 PM IST
धक्कादायक! पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या हत्येमध्ये ठाकरे गटाच्या आमदाराचा सहभाग? title=

प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : पत्रकार शशिकांत वारिसे (Shashikant Warise Death) यांचा अपघाती मृत्यूनंतर राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरुन विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहून गंभीर आरोप केले आहेत. दुसरीकडे पत्रकार वारिसे यांची हत्या हा अपघात नसून पूर्वनियोजित खूनाचा कट असल्याचा आरोप कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक वालम (Ashok Valam) यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून कठोर कारवाईची मागणीही वालम यांनी केली आहे. यासोबत यामध्ये स्थानिक आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांच्यावरही वालम यांनी गंभीर आरोप केले आहेत.

राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या दुचाकाली सोमवारी थार गाडीने धडक दिली होती. या गंभीर अपघातानंतर वारिसे यांना कोल्हापूर येथे उपचारांसाठी हलवण्यात आले होते. मात्र मंगळवारी त्यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. यानंतर हे प्रकरण चांगलेच तापलं. या प्रकरणातील संशयित आरोपी म्हणून पंढरीनाथ आंबेरकर याला पोलिसांनी अटक केली असून त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पंढरीनाथ आंबेरकर यानेच त्याच्या थार गाडीने वारिसे यांच्या दुचाकीला धडक देऊन चिरडत नेले असा आरोप करण्यात आला आहे.

शशिकांत वारिसे यांच्या मृत्यूनंतर राज्यातील पत्रकार संघटनांसह, राजकीय नेतेही आक्रमक झाले आहेत. वारिसे यांची हत्या झाल्याचा आरोप करत विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. रत्नागिरीत सुरु असलेल्या आंदोलनामध्ये कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक वालम यांनी ठाकरे गटाचे स्थानिक आमदार राजन साळवी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
 
राजन साळवी यांना सहआरोपी करा - अशोक वालम

"लोकशाहीचा खून करण्यात आला आहे. पूर्वनियोजित कट रचून हा खून करण्यात आला आहे. यामध्ये स्थानिक आमदार राजन साळवी यांनाही सहआरोपी बनवण्यात यायला पाहिजे. कारण पूर्वनियोजित कट रचून हा खून करण्यात आला. भररस्तात दिवसा पत्रकाराला चिरडून मारण्यात आले आहे. दोन वर्षापूर्वीही सरपंचाच्या मुलाला अशाच प्रकारे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. जैतापूर येथेही एका पत्रकाराचाही खून करण्यात आला होता. या प्रकरणाचे सूत्रधार सापडत नाहीत तोपर्यंत माघार घेणार नाही," असा इशारा  कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक वालम यांनी दिला आहे.