अखेर विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपला, आता लक्ष मतदानाकडे

महाराष्ट्र विधानसभेच्या तब्बल २८८ मतदारसंघांसाठी निवडणुकीच्या तारखांची घोषणा २१ सप्टेंबर रोजी करण्यात आली होती

Updated: Oct 19, 2019, 07:20 PM IST
अखेर विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपला, आता लक्ष मतदानाकडे title=

मुंबई : विधानसभा निवडणूक २०१९ साठी अखेर भर पावसात प्रचार संपलाय. निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी भर पावसातही सर्वपक्षीय नेत्यांनी प्रचाराची राळ उडवून दिली. अखेरचा दिवस असल्यानं सकाळपासूनच दिग्गज नेत्यांच्या सभा होमग्राऊंडवर पार पडल्या. मुख्यमंत्र्यांनी चंद्रपूर आणि नागपुरात सभा घेतल्या. तर आदित्य ठाकरे यांचा रोड शो वरळीत पार पडला. उद्धव ठाकरे यांनी भर पावसात श्रीवर्धन आणि उरणमध्ये सभा घेतल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज नातवासाठी कर्जत जामखेडमध्ये सभा घेतली. त्यानंतर बारामतीत अजित पवार यांच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत सभा पार पडली. तर ओवेसी यांची सभा औरंगाबादेत पार पडली.  

महाराष्ट्र विधानसभेच्या तब्बल २८८ मतदारसंघांसाठी निवडणुकीच्या तारखांची घोषणा २१ सप्टेंबर रोजी करण्यात आली होती. यानुसार, २१ ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात महाराष्ट्रभर मतदान पार पडणार आहे. तर २४ ऑक्टोबर रोजी या निवडणुकीचा निकाल समोर येईल. महाराष्ट्रात 'महायुती'तील भाजपा १६४ तर शिवसेना १२४ जागांवर लढत आहे. तर त्यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेस - राष्ट्रवादीकडून वेगवेगळ्या उमेदवारांना संधी देण्यात आलीय.

दरम्यान, निवडणुकीत मतदारांना आमिष दाखवण्याच्या हेतूनं पैसे आणि दारुचा महापूर वाहिल्याचं धक्कादायक वास्तव सरकारी आकडेवारीतून समोर आलंय. निवडणूक आचारसंहिता लागल्यापासून प्रचार संपण्याच्या आजच्या दिवसापर्यंत राज्यात तब्बल १४२ कोटी ७७ लाखांचं सोनं चांदी, रोकड आणि दारु जप्त करण्यात आलीय. यात तब्बल ५२ कोटी ७० लाखांची रोकड आहे. तर २१ कोटी ५४ लाखांची दारु, २० कोटी ७१ लाखांचं अंमली पदार्थ आणि २४ कोटी ६६ लाखांच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. मतदारांना आमिष दाखवण्यासाठी उमेदवारांनी नाना कल्पना युक्त्या लढवल्या. पैशांचा महापूर वाहिला. निवड़णूक आयोगानं वेगवेगळ्या यंत्रणाच्या मार्फत ही कारवाई केलीय.