ठाण्यात एटीएममधील पैशावर डल्ला मारणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, ४ जणांना अटक

एटीएममध्ये स्कीमर आणि कॅमेरा लावून पैशावर डल्ला मारणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. ठाणे पोलिसांच्या सायबर सेलने कारवाई करत चार जणांना अटक केली. यात एका महिलेचाही समावेश आहे.

Updated: Oct 14, 2017, 07:28 AM IST
ठाण्यात एटीएममधील पैशावर डल्ला मारणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, ४ जणांना अटक title=
संग्रहित छाया

ठाणे : एटीएममध्ये स्कीमर आणि कॅमेरा लावून पैशावर डल्ला मारणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. ठाणे पोलिसांच्या सायबर सेलने कारवाई करत चार जणांना अटक केली. यात एका महिलेचाही समावेश आहे.

 दुसऱ्यांच्या अकाऊंटमधल्या पैशांवर एटीएमच्या माध्यमातून स्मार्ट पद्धतीने डल्ला मारणाऱ्या टोळीचा ठाणे पोलिसांच्या सायबर सेलने अटक केली. ठाण्याच्या मुंब्रा-कौसा भागातील साऊथ इंडियन बँक आणि इंडियन बँक या दोन एटीएमध्ये स्कीमर आणि कॅमेरा लावून आरोपींनी क्लोनिंगद्वारे नवीन कार्ड निर्माण केले.

४८ तासांत या आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणी ही बनावट कार्ड्स वापरुन सुमारे २० लाख इतकी रक्कम काढली होती. आपली फसवणूक झाल्याची तक्रार ४९ ग्राहकांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात केली होती. यानंतर सायबर सेलने तब्बल साडेपाच लाख फोन कॉल केले. यापैकी ४ फोन नंबर या कामासाठी वापरण्यात आल्याचं निष्पन्न झालं. 

त्यानुसार चौघांवर लक्ष ठेवून त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्यात. हैदरअली सारंग, तबस्सुम अबू बखर मेस्त्री उर्फ जान्हवी, सोहेल उमर शेख आणि मोहम्मद जैद फरीद रंगवाला अशी चौघांची नावे आहेत. एटीएममध्ये कॅमेरा आणि स्कीमर लावून ही टोळी कार्ड कॉपी करून घेत असे. त्यानंतर बनावट कार्ड बनवून त्याद्वारे विविध ए टी एम कार्डमधून ही टोळी पैसे काढून घेत असे. वर लावलेल्या कॅमेऱ्यामुळे एटीएम पिन क्रमांक मिळवणे त्यांना सोपे जात असे.