सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : लष्कर ए तोयबा (Lashkar-e-Taiba) या दहशतवादी संघटनेच्या (Terrorist Organization) संपर्कात असणाऱ्या एका तरुणाला एटीएसने (ATS) पुण्यातून (Pune) अटक केली आहे. ही कारवाई पुण्यातील दापोडी परिसरात केली गेली आहे. या कारवाईत अटक केलेल्या तरुणाचे नाव मोहम्मद जुनेद असं आहे.
मोहम्मद जुनेद एका मदरशाजवळ राहत होता. लष्कर ए तोयबाच्या जम्मू (Jammu-Kashmir) इथल्या आफताब शहा आणि उमर या दोघांच्या संपर्कात तो होता. या दोघांकडून त्याच्या बँक खात्यावर अतिरेकी कारवायांसाठी पैसे जमा झाले होते. अतिरेकी संघटनेसाठी तरुण मुलांची भरती करणे आणि दारूगोळा आणि शस्त्रे चालविण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी त्याला फंडिंग केली जात होती.
दापोडी परिसरातील एका मदरशाजवळ तो भाड्याच्या घरात राहत होता. या परिसरातील काही स्थानिक तरुणांच्या संपर्कातही जुनेद होता. स्थानिक तरुणांना अतिरेकी कारवायात सहभागी करून घेण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू होते. त्याच्या संपर्कात असलेल्या काही तरुणांनी देश सोडला असल्याचीही माहिती समोर येत आहे.
काल दुपारपासून त्याची चौकशी सुरू होती. त्यानंतर जुनेद चौकशीत दोषी आढळल्याने रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुनेद हा मूळचा बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील रहिवाशी आहे. जुनेद गेल्या दीड वर्षांपासून पुण्यात राहत होता. जुनेदचे शिक्षण मदरशात झालं आहे.
लष्कर-ए-तैयबा-लष्कर-ए-तैयबा ही दक्षिण आशियामधील एक मोठी आणि सर्वांत कार्यरत इस्लामी मूलतत्त्ववादी आणि दहशवादी संघटना आहे. भारत, पाकिस्तान, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ब्रिटन, युरोपियन युनियन, रशिया आणि ऑस्ट्रेलिया या देशांत या संघटनेवर बंदी आहे.
राज्यातील तरुणांना लष्कर ए तोयबा संघटनेत भरती करण्याचा जुनेदचा डाव होता. जुनेद मोहम्मद हा जम्मू काश्मीर इथल्या प्रतिबंधित दहशतवादी संघटना लष्कर ये तोएबाच्या सक्रिय सभासदांच्या संपर्कात होता. त्याच्या मदतीने वेगवेगळ्या राज्यातील तरुणांना लष्कर ए तोएबा या संघटनेत भरती करून त्यांना आतंकवादी कारवाया करण्याचे प्रशिक्षण देण्याकरता जम्मू काश्मीर इथं नेण्याचा प्रयत्न तो करत होता.
या कामाकरिता त्याला जम्मू काश्मीर इथल्या अकाऊंटवरून रक्कम जमा झाल्याचे निष्पन्न झालं आहे. याशिवाय तो वेगवेगळ्या व्हाट्स अप ग्रुप आणि फेसबुक द्वारे राष्ट्रीय सुरक्षिततेला बाधा होईल अशा चिथावणीखोर पोस्ट करुन भागातील धार्मिक ऐक्य आणि जातीय सलोखा धोक्यात आणून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होता. हे निष्पन्न झाल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.