परतूरमध्ये पालिका दरबारी आढळली 'पाकिस्तान गल्ली', नगर पालिकेचा कारनामा

परतूर शहरात मालमत्ता कर आकारणीसाठी नुकताच सर्वे करण्यात आला. यात शहरातील अनेक मालमत्तांचे निरीक्षण करून त्यांना मालमत्ता करांच्या नोटीसा देण्यात आल्या.  

Updated: May 24, 2022, 03:01 PM IST
परतूरमध्ये पालिका दरबारी आढळली 'पाकिस्तान गल्ली', नगर पालिकेचा कारनामा title=

जालना : जालन्यातील परतुरमध्ये एका गल्लीचे नाव चक्क पाकिस्तान गल्ली असं आढळून आलंय. परतूर नगर पालिकेच्या मालमत्ता कर आकारणीच्या पावतीत हा प्रकार समोर आलाय.

सध्या परतूर नगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात आहे. त्यातच परतुरमध्ये पाकिस्तान गल्ली असल्याचा उल्लेख पालिकेच्यावतीने देण्यात आलेल्या मालमत्ता कर आकारणीच्या पावतीत आढळून आल्यानं संतापाची लाट उसळली आहे.

परतूर शहरात मालमत्ता कर आकारणीसाठी नुकताच सर्वे करण्यात आला. यात शहरातील अनेक मालमत्तांचे निरीक्षण करून त्यांना मालमत्ता करांच्या नोटीसा देण्यात आल्या. 

या प्रकारामुळे शहरात नाराजीचे वातावरण पसरले असतानाच जुना मोंढा भागातील शनिमंदिर आणि प्रबुद्धनगर येथील काही रहिवाशांना 'पाकिस्तान गल्ली' असा पत्ता असलेली नोटीस दिली देण्यात आली आहे.

पालिकेत चाललेला अनागोंदी कारभार देखील या निमित्ताने चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान, परतुरचे भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी परतुरमध्ये काँग्रेसला पाकिस्तान निर्माण करायचा आहे का? असा सवाल उपस्थित करत या घटनेचा निषेध व्यक्त केलाय.

निवडणूक जवळ आल्याने काँग्रेसनं हा मुद्दाम खोडसाळपणा केला असून हा खोडसाळपणा करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणीही लोणीकर यांनी केलीय.