विशाल करोळे, औरंगाबाद : नशेसाठी वापरण्यात येणारी औषधं विकणाऱ्या एका टोळीचा औरंगाबाद पोलिसांनी पर्दाफाश केलाय. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय ऑनलाईन पद्धतीनं ही औषधं विकण्यात येत होती. पोलिसांनी काही दिवस या सगळ्या प्रकरणाची रेकी करून दोन आरोपींना अटक केलीय.
औषधांच्या माध्यमातून नशा करणाऱ्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललंय. सरकारनं या प्रकारच्या अनेक औषधांची विक्री बंद पाडलीय. तर काही औषधं डॉक्टरांच्या पत्राशिवाय द्यायची नाहीत, असा नियमही बनवलाय. मात्र तरीसुद्धा या औषधांची ऑनलाईन विक्री सुरुच आहे.
अशाच एका टोळीला औरंगाबाद पोलिसांनी जेरबंद केले आहे. दिल्लीतून ऑनलाईन पद्धतीनं ही औषधं विकल्या जात होती आणि याचा वापर नशेसाठी सर्रास सुरु होता. पोलिसांच्याच गाडीतून चोरी करणा-या एका लहान मुलाला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यानं नशेची औषधी विकत घेण्यासाठी चोरी केल्याचं सांगितलं आणि त्यातून पोलिसांनी धागेदोरे पकडत संपूर्ण रॅकेटच उद्धवस्त केलंय. या प्रकरणात हे औषधी विकणा-यांना अटक करण्यात आलीय तर दोन दुकानं सुद्धा सिल करण्यात आले आहेत.
या प्रकरणाचे धागोदोरे दिल्लीपर्यंत आहे, तसेच अशी औषधं विकणा-या अनेक वेबसाईट्स असल्याचंही पोलिसांनी सांगितलंय. त्याद्वारे पोलिसांचा तपास सुरु आहे, आणि काही गंभीर आजाराची औषधं आता डॉक्टारांच्या चिठ्ठीविना विकण्यात आली तर अशांवर आता पोलिसांची कारवाई अटळ असल्याचं पोलिस आयुक्तांनी सांगितले आहे.
लहान लहान मुलांचं आयुष्यही सहज मिळणारी औषधं उद्धवस्त करतायेत. सरकारनं बंदी आणल्यावरही याची विक्री जोरात सुरु आहे त्यामुळं अशा लोकांवर कठोर कारवाई केल्यावरच याला आळा बसेल.