Maharashtra Assembly Election: लोकसभा निवडणुकीत 84 वर्षांच्या तरुणानं महाराष्ट्र पिंजून काढला आणि वातावरण फिरवलं. राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर 10 पैकी 8 खासदार निवडून आणत पवारांनी आपलं वर्चस्व सिद्ध केलं. आता विधानसभा निवडणुकीतही पवारांनी तोच पॅटर्न कायम ठेवत प्रचाराचा धुरळा उडवलाय. वयाच्या 84व्या वर्षी शरद पवार एखाद्या तरुणाला लाजवेन अशा उर्जेनं राज्यभर फिरताहेत. 84 वर्षांचा हा तरुण नेता महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे तब्बल 56 जाहीर सभा घेणार आहे. दरदिवशी 4ते5 सभा घेत पवारांचा झंझावाती दौरा सुरू आहे. वयाचा उल्लेख केलेला पवारांना फारसा आवडत नाही. पण अजितदादांनी तोच मुद्दा पुढं करुन बारामतीचा राजकीय वारसदार आपणच असल्याचा दावा केलाय.
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारसभेत शिवसेनेचे नेते सचिन आहीर यांनी पवारांच्या वयाचा उल्लेख केला....त्यानंतर भाषणाला उभ्या राहिलेल्या शरद पवारांनी वयाच्या मुद्यावरून मिश्कील टोलेबाजी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर अजित पवारांनी अनेकदा शरद पवारांच्या वयाचा मुद्दा उकरून काढला. शरद पवारांनी सक्रीय न राहता मार्गदर्शन करून आमच्याकडे नेतृत्व सोपवावं अशाप्रकारची वक्तव्यं अजित पवारांनी केली. मात्र शरद पवारांनी त्यावर फारशी प्रतिक्रिया न देता लोकसभेच्या निकालानंतर आपलं वर्चस्व सिद्ध केलं. राष्ट्रवादीमधीलच नव्हे तर राजकीय विरोधकही पवारांचा प्रचंड आदर करतात. त्यांच्या वयानुसार त्यांची काम करण्याच्या पद्धतीबद्दल अनेकजण भरभरून बोलतात. आता पुन्हा एकदा विधानसभेचं मैदान मारण्यासाठी 84 वर्षांचा तरुण नेता रणांगणात उतरलाय. महाराष्ट्र ढवळून काढणा-या 84वर्षांच्या तरूण नेत्याला जनता किती प्रतिसाद देते हे पाहणं आता महत्त्वाचं आहे.