विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : औरंगाबादेत हुरड्याला काजूचा भाव आला आहे, एक किलो हुरड्यासाठी आता तब्बल ६०० रुपये मोजावे लागत आहेत.
औरंगाबादच्या गुलमंडी बाजारात ग्रामीण भागातून येऊन शेतकरी हुरडा विकतात. एरव्ही हुरड्याला १०० ते १५० रुपये किलो इतकाच भाव असतो. मात्र, आज या भावानं थेट चार पट मजल मारत एक किलो हुरड्यामागं ६०० रुपयांची मजल मारलीय.
खरंतर डिसेंबर महिन्यात हुरडा खाण्याची एक वेगळीच मजा असते. हुरड्याला खवय्यांची मोठी मागणी असते त्यामुळं अनेक ठिकाणी 'हुरडा पार्टी'सारखे प्रकारही सुरु झालेत. त्यात घरी हुरडा खाण्यासाठी लोक गुलमंडीवरून घेऊन जातात. आता सीझन संपत आल्यानं हुरडा कमी झालाय आणि मागणी वाढली त्यात ३१ डिंसेबर आल्यानं मोठ्या प्रमाणात पार्टीसाठी हुरडा विकला जाऊ लागला आणि त्यामुळंच हुरड्याचे भाव थेट ६०० वर पोहोचले. यामुळे हुरडा विकणारे शेतकरी जाम खूश असून ३१ डिंसेबर पावला असंच ते म्हणतायत.
तर खाण्याला काय पैशांची चिंता, आवडीला मोल नाही असं सागत लोकही हुरडा खरेदी करता आहेत. हुरड्याची मजा ३१ डिसेंबरला चाखायचीच म्हणत लोक हुरड्यावर तुटून पडतायत.
हुरड्याची ही किंमत अगदी काजूच्या किमती इतकी झालीये, खर तर हुरड्याला इतका भाव मिळण्याची ही पहिलीच वेळ असावी, मात्र हौसेला मोल नाही असं सांगत 'होऊ दे तोटा, थर्टी फर्स्ट आहे मोठा' असं सांगत लोकही हुरड एन्जॉय करतायत आणि विकणारे शेतकरीसुद्दा...