भाजपाकडून ३ वेळेस निवडून आलेल्या आमदाराला भरसभेत मारहाण

मंचावर बसलेले भाजपाचे माजी आमदार बी एस पाटील यांना मारहाण करण्यात आली आहे. मंचासमोरील कार्यकर्त्यांनी मंचावरून बीएस पाटील यांना खाली ओढण्याचा प्रयत्न केला.

Updated: Apr 11, 2019, 12:06 AM IST
भाजपाकडून ३ वेळेस निवडून आलेल्या आमदाराला भरसभेत मारहाण title=

विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव : अमळनेर शहरात आज भाजपाचा मेळावा सुरू असताना, मंचावर बसलेले भाजपाचे माजी आमदार बी एस पाटील यांना मारहाण करण्यात आली आहे. भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी बी एस पाटील यांना मंचावर मारहाण केल्याचं स्पष्ट दिसत आहे. यानंतर मंचासमोरील कार्यकर्त्यांनी मंचावरून बीएस पाटील यांना खाली ओढण्याचा प्रयत्न केला. तसेच एका कार्यकर्त्याने पाय ओढत बीएस पाटील यांना मंचावर ओढले, कार्यकर्ते मंचावर चढू नयेत म्हणून, गिरीश महाजन कार्यकर्त्यांना अडवताना दिसत आहेत. हा वाद भाजपाचे तिकीट देण्यावरून झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. ज्या आमदाराला मारहाण झाली, ते बी एस पाटील अमळनेर विधानसभा मतदारसंघातून भाजपाकडून ३ वेळेस निवडून आले आहेत.

तिकीट वाटपावरून हा वाद असल्याचं सांगण्यात येत आहे, जेव्हा भाजपाचे खासदार एटी पाटील यांना तिकीट मिळालं नाही, तेव्हा पारोळा शहरात एटी पाटील यांनी एक सभा घेतली होती, त्या सभेत बीएस पाटील यांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्याविरोधात टीका केली होती. यानंतर भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या पत्नी, तसेच भाजपाच्या विधान परिषद सदस्य स्मिता वाघ यांना भाजपाचे देण्यात आलेले तिकीट नाकारण्यात आलं होतं. यावरून हा वाद असल्याचं सांगण्यात येत आहे.

जळगाव लोकसभेचं भाजपाचं तिकीट आमदार स्मिता वाघ यांना नाकारून, ते आता ऐनवेळी चाळीसगावचे भाजप आमदार उन्मेष पाटील यांना देण्यात आलं आहे. यावरून हा आज हा वाद अमळनेरच्या भाजपा मेळाव्यात उफाळून आला, आणि भाजपाचे माजी आमदार डॉ. बी एस पाटील यांना मारहाण झाल्याचं सांगण्यात येत आहे.

यावेळी मंचावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, भाजपाचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार उन्मेष पाटील, शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांच्यासह आमदार शिरीष चौधरी देखील उपस्थित होते.