आतिष भोईर, कल्याण : कल्याण पूर्वेतील आमराई परिसरातील एका कचराकुंडीच्या ठिकाणी नवजात बाळ आढळलं. याची माहिती मिळताच योगिता गायकवाड आणि योगेश गव्हाणे यांनी लागलीच या ठिकाणी धाव घेत या चिमुकल्या बाळाला या ठिकाणाहून उचलले. याबाबतची माहिती कोळसेवाडी पोलिसांना देत या नवजात बाळाला महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात नेण्यात आले. परंतू या रुग्णालायात बालरोग तज्ञ नसल्याने येथील डॉक्टरांनी त्यांना खाजगी रुग्णालयात नेण्यास सांगितले. त्यानंतर या बाळाला कल्याण पश्चिमेतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या बाळाची प्रकृती उत्तम असून कोळसेवाडी पोलीस याबाबत पुढील तपास करत आहेत. तर या नवजात अर्भकाला कचरा कुंडीत टाकणाऱ्या माता पित्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
दरम्यान काही दिवसापूर्वीच कल्याणच्या कचोरे खाडीमध्ये अडकलेल्या 2 चिमुरड्यांना स्थानिक नागरिकांनी वाचवले होते. यामध्ये एका सहा महिन्यांच्या तान्ह्या बाळाचाही समावेश आहे. हे दोघे खाडीमध्ये याठिकाणी नेमके आले कसे याबाबत ठोस माहिती नसली तरी एक महिला या दोघांना खाडीतील बेटावर सोडून निघून गेल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती.