वाल्मिक जोशी, झी 24 तास जळगाव : विजेचा धक्का बसल्यानंतर आपल्या आई आणि बहिणीचा जीव वाचवणाऱ्या मुलीचा धाडसाचा सन्मान करण्यात आला आहे. 5 वर्षांच्या शिवांगी काळेचा पंतप्रधान मोदींच्या यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं बाल शौर्य पुरस्कार देऊन गौरव केला.
पुरस्कार मिळाल्यानंतर खूप छान वाटत असल्याची भावना यावेळी शिवांगी हिने व्यक्त केली आहे. आपली आई अंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेली तेव्हा तिला गरम पाण्याचे हिटर लावलेल्या बादलीत शॉक लागल्याचं माझ्या लक्षात आलं.
विजेचा शॉक लागला तर आपण काय केले पाहिजे या विषयी मला शाळेत शिकवलं होतं. आई वडिलांनी शिकवलेलं वीज बटन बंद करण्याची आठवण मला आली आणि मी तत्काळ विजेचे बटन बंद केलं.आई आणि तिच्या जवळच असलेल्या माझ्या लहान बहिणीचा यामुळे जीव वाचला. असंही शिवांगी हिने यावेळी सांगितलं.
शिवांगी काळेला आज मिळालेल्या बाल शौर्य पुरस्कार बदल बोलतांना तिची आई गुलबक्षी काळे आणि वडील प्रसाद काळे यांनी आपल्या आयुष्यातील हा अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण असल्याची प्रतिक्रिया दिली.
शिवांगीने दाखवलेल्या समय सुचकतेमुळे आपला आणि आपल्या दुसऱ्या मुलीचा जीव वाचला. आपण पाणी गरम करतांना लोखंडी बादलीत पाणी लावले होते आणि ते सुरू असतानाच ती बादली आपण हातात घेतली आणि विजेचा धक्का बसला. माझी किंचाळी ऐकून शिवांगीनं विजेचं बटण बंद करून जीव वाचवला. ती नसती तर मोठा अनर्थ घडला असता अशी आईनं प्रतिक्रिया दिली आहे.
हिटर सुरू असताना पाण्याची बादली उचलण्याची जी चूक केली ती चूक खर तर व्हायला नको असा खेदही त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी अशी चूक कोणी करू नये असं आवाहन देखील नागरिकांना केलं आहे.