सुनेत्रा पवारांच्या कुटुंबाकडे तब्बल 123 कोटींची संपत्ती; त्या नेमकं काय काम करतात?

Baramati Loksabha Election : बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातून मोठी माहिती समोर आली आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडे बँक ठेवी आणि कर्जाची कोट्यवधींची रक्कम असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.

आकाश नेटके | Updated: Apr 19, 2024, 08:37 AM IST
सुनेत्रा पवारांच्या कुटुंबाकडे तब्बल 123 कोटींची संपत्ती; त्या नेमकं काय काम करतात? title=

Baramati Loksabha Election : बारामती लोकसभा मतदारसंघात सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी तगडी लढत होणार आहे. बारामतीमधल्या या नणंद भावजयीच्या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. सुप्रिया सुळेंच्या विजयासाठी शरद पवार हे बारामतीमध्ये तळ ठोकून आहेत. तर सुनेत्रा पवारांना लोकसभेत पाठवण्यासाठी महायुतीने संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. अशातच दोन्ही उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रातून सुनेत्रा पवारांच्या संपत्तीबाबत माहिती समोर आली आहे.

सुनेत्रा पवार यांनी गुरुवारी त्यांचा निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून सुनेत्रा पवार अब्जाधीश असल्याची माहिती समोर आली आहे आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार, अजित पवार आणि कुटुंबीयांची एकत्रित मालमत्ता १२३ कोटी ४६ लाख १७ हजार ७५८ रुपये इतकी आहे. 

सुनेत्रा पवारांकडे एकूण स्थावर मालमत्ता ५८ कोटी ३९ लाख ४० हजार ७५१ इतकी आहे. तर त्यांची स्वसंपादित मालमत्ता ही १८ कोटी ११ लाख ७२ हजार १८५ रुपये आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडे शेअर्स/ बॉन्ड इत्यादीच्या माध्यमातून १५ लाख ६९ हजार ६१० रुपयांची संपत्ती आहे. तर बचत पत्रांमधून सुनेत्रा पवारांकडे ५७ लाख ७६ हजार ८७७ रुपये आहेत. 

सुनेत्रा पवार यांच्या हातामधील रोख रक्कम ३ लाख ९६ हजार इतकी आहे. त्यांच्या बॅंकेमध्ये ५ कोटी ३० लाख ७५ हजार रुपयांच्या ठेवी आहेत. तर ६३ लाख ७३ हजार ३६० रुपयांचे दागिने सुनेत्रा पवारांकडे आहेत. या दागिन्यांमध्ये ७५ किलो चांदी, एक किलो सोने, हिऱ्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. सुनेत्रा पवार यांच्या नावावर एक ट्रॅक्टर, दोन ट्रेलर आहेत. मात्र त्यांच्याकडे स्वतःची एकही चारचाकी नाही. तर अजित पवार यांच्या नावावर तीन ट्रेलर, एक ट्रॅक्टर आणि दोन कार आहेत. या वाहनांची एकूण किंमत ही ८६ लाख ४२ हजार १०२ रुपये इतके आहे. यासोबत पवार कुटुंबीयांकडे एकूण  २९ कोटी ६५ लाख २९ हजार ८१३ रुपयांची जंगम मालमत्ता आहे.

सुनेत्रा पवार काय काम करतात?

सुनेत्रा पवार यांनी वाणिज्य शाखेतून पदवी प्राप्त केलीय. तर सुनेत्रा पवार शेती आणि व्यवसाय करतात अशी माहिती प्रतिज्ञापत्रात देण्यात आलीय. सुनेत्रा पवार यांनी त्यांची नणंद आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार सुप्रिया सुळेंना ३५ लाख तर शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना ५० लाख, अजित पवार यांना ६३ लाख २० हजार रुपयांचे कर्ज दिलंय.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x