कोरोनाचे सावट : रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर शुकशुकाट

 कोरोनाचा पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. रायगडच्या किनाऱ्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे. 

Updated: Mar 18, 2020, 06:06 PM IST
कोरोनाचे सावट : रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर शुकशुकाट title=
संग्रहित छाया

अलिबाग :  कोरोनाचा पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. रायगडच्या किनाऱ्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे. ३१ मार्चपर्यंत पर्यटनावर आधारित व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. दरम्यान, चांगल्या कामासाठी हा व्यवसाय बंद असला तरी त्याचे वाईट वाटत नाही. कोरोना व्हायरसबाबत सगळ्यांनीच काळजी घेण्याची गरज आहे. धोका पत्करुन व्यवसाय करणे खऱ्या अर्थाने योग्य होणार नाही, अशी प्रतिक्रिया काही व्यवसायिकांनी व्यक्त केली आहे.

जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसचा फटका रायगड जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाला बसला आहे . जिल्ह्यातील अलिबागसह नागाव , मुरुड , काशीद दिवेआगर येथील किनारे ओस पडले आहेत . अलिबाग जवळच्या नागाव ग्रामपंचायतीने शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत पुढील १५ दिवस हा व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या बैठकीत घेतला . 

नागाव येथील पर्यटनावर आधारित स्टॉल्स , कॉटेजेस , रिसॉर्ट ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत . या निर्णयाला व्यावसायिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे . नागाव प्रमाणेच मुरुडमधील काशीद , ग्रामपंचायत व स्थानिक व्यावसायिकांनी स्वताहून पुढाकार घेत आपले पर्यटनावर आधारित सर्व व्यवसाय बंद ठेवले आहेत, अशी माहिती नागवा ग्रामपंचायत समित सदस्य हर्षदा मयेकर यांनी दिली. तसेच व्यावसायिक दादा कुंभार  यांनीही याबाबत माहिती दिली. ते म्हणालेत, राज्यात आलेल्या संकटावर मात करण्यासाठी सगळ्यांनीच काळजी घेतली पाहिजे. ते सर्वांचे काम आहे.