40 वर्षापासून पिकांच्या नवीन वाणाचं संशोधन करणारा अवलिया , कापसाच्या शेकडो व्हरायटीचं संशोधन

आठ ते दहा फुटांहुन अधिक उंच कापसाचे झाड, संशोधनात नवा आविष्कार, डेरेदार कापसाच्या झाडाला बहरली शेकडो बोंडे

Updated: Feb 26, 2022, 08:21 PM IST
40 वर्षापासून पिकांच्या नवीन वाणाचं संशोधन करणारा अवलिया , कापसाच्या शेकडो व्हरायटीचं संशोधन  title=

विष्णु बुरगे, झी मीडिया, बीड :  बीड म्हटलं की दुष्काळी भाग. मात्र याच दुष्काळी जिल्ह्यात एक असा अवलिया आहे जो गेल्या चाळीस वर्षापासून शेती पिकांच्या नवीन व्हरायटी विकसित करण्यावर अथक मेहनत घेतली. कापसावर केलेल्या संशोधनात त्यांच्या हाती एक अशी व्हरायटी लागली आहे ती पाहून तुम्हीही थक्क व्हाल.  

या अवलियाचं नाव आहे किसान देव नागरगोजे. 65 वर्षांच्या किसान नागरगोजे यांनी बीड शहरालगत दहा एकर जमीन भाडेतत्त्वावर घेतली. या जमीनीत गेल्या 40 वर्षांपासून किसान देव नागरगोजे संशोधन करत आहेत. शेतकरी असलेल्या या संशोधकांने आजपर्यंत अनेक नवीन नवीन पिकांच्या जाती, वाण शोधून काढले आहेत.

यात मागील काही वर्षापासून त्यांनी कापसावर संशोधन करायला सुरुवात केली आणि 100 हून अधिक कापसाच्या जाती त्यांनी शोधून काढल्या त्यातली 1 व्हरायटी अशी आहे जी आठ ते दहा फुटांहून अधिक वाढते. हे कापसाचे झाड पाहिल्यानंतर आपल्याला त्याचा प्रत्यय येईल एक झाड पूर्ण डेरेदार आकाराचा बनलं आहे. याला शेकडो बोंड पाहायला मिळत आहेत. या कापसाच्या झाडाची उंची आठ ते दहा फूट वाढत असल्याने यातून शेतकऱ्यांना विक्रमी उत्पादन मिळेल असा विश्वास नागरगोजे यांना आहे. 

सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत त्यांचं पिकांच्या नवीन प्रजाती निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू असतात. त्यांनी केलेले संशोधन जगासमोर येण्याची गरज आहे. विद्यापीठांनी याठिकाणी येऊन आपण जो प्रयोग केला आहे त्याची तपासणी करावी आणि आपण केलेलं संशोधन जगासमोर यावं यातून शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा अशी आशा किसान देव नागरगोजे यांना आहे 

बीड जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना त्यांनी  शोधलेल्या नवीन व्हरायटीची बियाणे उपलब्ध करून दिलेली आहेत. त्यातून शेतकऱ्यांना फायदाच झाला आहे मात्र जे संशोधन त्यांनी केलं आहेत त्याचा फायदा राज्य देशासह जगाला व्हावा अशी अपेक्षा बीडच्या नागरिकांना वाटतेय

शेतकरी आणि समाज कल्याणासाठी किसान देव नागरगोजे यांनी प्रयोगातून पुढे आणलेल्या शेती पिकांच्या विविध जाती शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी सरकार आणि कृषी विद्यापीठांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. कृषी विद्यापीठात संशोधन होतं त्याला छेद देत या अवलियाने आपल्या शेतीलाच कृषी विद्यापीठ करून नवनवीन व्हरायटी शोधून हे दाखवून दिले आता गरज आहे ती त्यांच्या संशोधनाला जगासमोर आणण्याची.