बीडमध्ये राष्ट्रवादीत अंतर्गत बंडाळी, मुख्यमंत्री करणार विकासकामांचं उद्घाटन

राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे नेते विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे आणि इतर नेत्यांना डावलण्यात आलं आहे

Updated: Feb 6, 2019, 11:29 AM IST
बीडमध्ये राष्ट्रवादीत अंतर्गत बंडाळी, मुख्यमंत्री करणार विकासकामांचं उद्घाटन  title=

लक्ष्मीकांत रुईकर, झी मीडिया, बीड : बीड नगरपरिषदेच्या विविध विकासकामांचं उद्घाटन आज करण्यात येणार आहे. उल्लेखनीय म्हणजे, बीड नगर पालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात... बीड विधानसभाही राष्ट्रवादीकडे मात्र नगरपरिषदेच्या विकासकामांच्या उद्घाटनाला मात्र भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असा अजब योग इथं जुळून आलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या कार्यक्रमातून राष्ट्रवादीचेच नेते हद्दपार असल्याचं चित्र इथं दिसून येतंय. 

या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना डावलून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित करण्यात आलंय. जयदत्त क्षीरसागर आणि त्यांचे बंधू नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांचं पक्षाविरोधात दबावतंत्र असल्याचं म्हटलं जातंय. आज बीडमध्ये जिल्हा रुग्णालयाचं भूमीपूजन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर विविध कार्यक्रमांचं आयोजनदेखील करण्यात आलंय. मात्र या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे दोन आमदार सोडता राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं नाही. त्यामुळे जिल्हातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. 

बीड नगरपरिषदेच्यावतीनं आज अटल अमृत पेयजल योजना, भुयारी गटार योजना, जिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन आणि नगर पालिकेच्या सभागृहाला स्व. गोपीनाथ मुंडे यांचे नाव अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. 

बीडमध्ये राष्ट्रवादीचे माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर हे आमदार आहेत तर त्यांचे बंधू भारतभूषण क्षीरसागर हे राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष आहेत. मात्र पुतण्या जिल्हा परिषद सदस्य संदीप क्षीरसागर यास पक्षानं महत्त्व दिल्यानं जयदत्त क्षीरसागर पक्षावर नाराज आहेत. त्यांनी अनेक वेळा याबाबत पक्षाकडे आपली नाराजी बोलून दाखवली आहे. 

दरम्यान नगर पालिकेत सत्ता असणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे नेते विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे आणि इतर नेत्यांना डावलण्यात आलं आहे. नाही म्हणायला आमदार सतीश चव्हाण आणि आमदार विक्रम काळे यांची नावं आमंत्रितांमध्ये आहेत. मात्र, राष्ट्रवादीकडे असणाऱ्या नगर पालिकेच्या कार्यक्रमातून राष्ट्रवाडीचे इतर नेते दूर आहेत. त्यामुळे आता क्षीरसागर यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाढती नाराजी पक्षाला हानिकारक ठरणार का? अशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहे.