हेमंत चापुडे, झी मिडीया, पुणे : जगातील सगळ्यात प्रामाणिक प्राणी म्हणजे कुत्रा. आजपर्यंत आपण मनुष्य, बैल, गायीचे वर्षश्राद्ध पहिले असेल पण पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात चक्क एका पाळीव कुत्र्याचे वर्षश्राद्ध घालण्यात आले आहे. शिरूर तालुक्यातील सादलगाव येथील दिगंबर दत्तोबा भगत हे आपल्या कुटुंबासह गेल्या वीस वर्षांपासून मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. मोलमजुरी करत असताना भगत कुटुंबाने एका भटक्या कुत्र्याला आसरा दिला होता.
त्याचं पालन पोषण, संगोपनाची संपूर्ण जबाबदारी या कुटुंबाने उत्तमरित्या पार पाडली. त्यांनी या भटक्या कुत्र्याचे नाव 'मोती' असे ठेवले होतं. एखाद्या मुक प्राण्याला जीव लावला की तो देखील आपल्यावर तेवढाचं जीव लावतो असं म्हटलं जातं. 'मोती' देखील तसाच होता. त्याने भगत कुटुंबाचे अनेक संकटातून रक्षण केले.
परंतू वर्षभरापूर्वी त्याचा अचानक मृत्यू झाला. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर ज्याप्रमाणे अंत्यविधी करण्यात येतात. तसेच मोतीच्या निधनानंतर हिंदू संस्कृतीप्रमाणे अंत्यविधी करण्यात आले. तर आता भगत कुटुंबाने एक वर्षानंतर न विसरता मोतीच्या वर्षश्राध्द आणि श्रध्दांजलीचा कार्यक्रम आयोजित केला. यावेळी ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने हजेरी लावत श्रध्दांजली अर्पण केली.
बऱ्याच ठिकाणी कुत्र्याला खंडोबाच्या रुपात पूजले जाते. कुत्र्याला दत्ताच्या मंदिरात मोठे स्थान आहे. मात्र सध्या तंत्रज्ञानाच्या युगात समाजाची बदलत चाललेले मानसिकता पाहता अनेक ठिकाणी कुत्र्यांची हत्या केली जाते अशा समाज कंठकांपुढे मोलमजुरी करून पोटाची खळगी भरणाऱ्या भगत कुटुंबाने एक नवा आदर्श ठेवला आहे हे मात्र नक्की..